जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे आयोजित धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना चांगलाच राजकीय रंग चढला आहे. दरम्यान, अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कोथळी येथे उपस्थिती लावून खडसे यांना शुभेच्छा दिल्या. भाजप नेत्यांपूर्वी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
खडसे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोथळी येथे गेल्या चार दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्री संत मुक्ताई चरित्र तसेच संगीत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून रविवारी अमृत महोत्सवाचा मुख्य सोहळा होणार आहे.
शनिवारी संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी कोथळी येथे हजेरी लावत खडसे यांची भेट घेतली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख शरद ढोले, जळगाव विभाग कार्यवाह स्वप्नील चौधरी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, देवगिरी प्रांताचे सह संघटनमंत्री ललित चौधरी यांची यावेळी उपस्थिती होती. या भेटीत खडसे यांना अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
राजकीय भेटीगाठींमुळे चर्चेला उधाण
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रदीर्घ काळ काम करताना राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, भाजपशी फारकत घेतल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात दाखल झाले. त्यानंतरही खडसे यांचे भाजपमधील अनेक नेत्यांशी तसेच संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी असलेले वैयक्तिक संबंध कायम राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खासकरून संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
विशेष म्हणजे, खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या एक दिवस आधी संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहिल्याने विविध राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ही भेट केवळ शुभेच्छा देण्यासाठी होती की त्यामागे काही राजकीय संदेश आहे, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी एकनाथ खडसे यांना वाकून नमस्कार केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे देखील उपस्थित होत्या
पवार, फडणवीस एकाच व्यासपीठावर?
रविवारी होणाऱ्या अमृत महोत्सवाच्या मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे केवळ खडसे यांच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्यापुरते न पाहता त्याला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संभाव्य उपस्थितीकडे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय संबंधांचा मोठा इतिहास आहे. भाजपमधील दोन्ही नेत्यांनी दीर्घकाळ एकत्र काम केले असले तरी पुढील काळात त्यांच्यात राजकीय मतभेदही निर्माण झाले. त्यामुळे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने फडणवीस आणि खडसे यांची संभाव्य भेट राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीही एकाच कार्यक्रमातील संभाव्य उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे रविवारी कोथळी येथे नेमके कोणते नेते उपस्थित राहतात आणि त्यांच्या भेटीगाठी होतात का, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कोथळी येथे धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांकडूनही मोठी तयारी करण्यात आली आहे.
