जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. खडसे यांच्या भाजपमधील संभाव्य घरवापसीच्या चर्चांनी आधीच जोर धरला असताना या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच भाजपचे संकटमोचक नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनाही खडसे समर्थकांनी अधिकृत निमंत्रण दिल्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.
जामनेर येथे खडसे समर्थक प्रा. सुनील नेवे आणि आमदार खडसे यांचे स्वीय सहायक योगेश कोलते यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत अमृत महोत्सवी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली. यावेळी त्यांनी महाजन यांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती केली गेली. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही, असे सांगत त्यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना पुन्हा उधाण आले आहे.
‘निमंत्रण मिळाल्यावर निर्णय घेऊ’
यापूर्वी पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी, “आम्हाला अद्याप एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाचे निमंत्रण मिळालेले नाही. निमंत्रण मिळाले तर कार्यक्रमाला जाण्याबाबत विचार करू,” असे विधान केले होते. आता त्यांना अधिकृत निमंत्रण मिळाले असले तरी ते या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाबाबतची उत्सुकता कायम आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे जिल्ह्यातील भाजपमध्येही हालचाली वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित राहू नये, अशी विनंती या भेटीत करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर महाजन यांना दिलेले निमंत्रण अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.
अमित शाहांच्या उपस्थितीची चर्चा
एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहू शकतात, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला खुद्द खडसे यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व वाढले आहे. शाहा यांच्या उपस्थितीमुळे राज्यातील अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने सर्वांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. भाजपमधील ज्येष्ठ नेते म्हणून दीर्घकाळ काम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना सातत्याने उधाण येत आहे. त्यामुळे अमृत महोत्सवी सोहळ्यातून ते कोणते संकेत देतात, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
कार्यक्रमातून मिळणार राजकीय संकेत?
एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरात आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्याला कोणकोणते नेते उपस्थित राहतात, व्यासपीठावरून कोणती भाषणे होतात आणि त्यातून भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत काही संकेत मिळतात का, याकडे राज्यभरातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन या कार्यक्रमाला उपस्थित राहतात की नाही, हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यावरून पुढील राजकीय घडामोडींचा अंदाज बांधला जात आहे.
