जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चांना दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असतानाच भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी या विषयावर शनिवारी सूचक आणि मिश्किल प्रतिक्रिया दिली. खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे असल्याचे संकेत देतानाच, त्यांच्या पुनरागमनाला स्थानिक पातळीवर विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील पुनरागमनाच्या शक्यतेची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चांना अधिक वेग आला. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून खडसे यांच्याशी संवाद सुरू असल्याचे संकेत या भेटीतून मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच दरम्यान, खडसे यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील ‘मातोश्री’ येथे भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना आणखी वेगळे वळण मिळाले. या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, खडसे नेमकी कोणती राजकीय दिशा स्वीकारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. “एकनाथ खडसे यांची थेट दिल्लीला हॉटलाईन आहे. मी फार छोटा माणूस आहे. माझी तर मुंबईतपर्यंतही हॉटलाईन नाही. आपण जळगावमध्ये बरे आहोत. त्यांना भाजप प्रवेशाविषयी वरून ग्रीन सिग्नल मिळाला असेल तर आमची काहीच हरकत असणार नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करणारे आम्ही कोण, असे मंत्री महाजन म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यातून एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीसंदर्भातील अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल, असा अप्रत्यक्ष संदेश देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबतही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचे अजून तरी आम्हाला निमंत्रण मिळालेले नाही. निमंत्रण मिळाले तर जाण्याबाबत विचार करू,” असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे खडसे-महाजन यांच्यातील राजकीय संबंधांबाबतही नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. महाजन यांच्या वक्तव्यामुळे खडसे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा नवे राजकीय परिमाण मिळाले असून, आगामी काळात भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि एकनाथ खडसे यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे राज्यातील ज्येष्ठ आणि प्रभावी नेते म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. पक्षातील  मतभेद आणि राजकीय घडामोडींनंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजप पुनरागमनाच्या चर्चांना सातत्याने उधाण येत आहे. त्यातच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी आणि विविध राजकीय हालचालींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.