जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अलीकडील राजकीय भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपमध्ये घरवापसीच्या चर्चांपासून ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीपर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पाटील यांनी, पहिला पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर सुरू करणे इतके सोपे नसते. शेवटी त्यासाठी नटही तसाच असावा लागतो, असा चिमटा काढला.
मंत्री पाटील यांनी शनिवारी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना खडसे यांच्या राजकीय हालचालींवर भाष्य केले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर खडसे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला. त्यानंतर खडसे यांनी मुंबईतील ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा रंगल्या. त्यामुळे खडसे नेमकी कोणती राजकीय दिशा स्वीकारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
ज्या घरात मंत्री, त्याच घरातून बाहेर पडले
या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “ते कोणत्या कारणासाठी भेटी घेत आहेत, हे मला माहिती नाही. मात्र, ज्या पक्षात राहून तुम्ही तब्बल १३ खात्यांचे मंत्री झाला, त्या घरातूनच तुम्ही बाहेर पडलात. आता पुन्हा त्याच घरात जाऊन काय मिळणार आहे? घरवापसी करून नेमके काय साध्य होणार, हा प्रश्न आहे. राजकारणात प्रत्येकजण आपला शेवटचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. कुटुंबातील सदस्य, समर्थक आणि कार्यकर्त्यांची लाईन लागावी, यासाठी प्रयत्न केले जातात. तसाच काहीसा प्रयत्न खडसे करत असावेत, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
सरकारवर टीका करा, तो तुमचा अधिकार
एकनाथ खडसेंकडून सरकारवर सातत्याने होत असलेल्या टीकेवर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, की “सरकारवर टीका करा, सरकारचे वाभाडे काढा, तो विरोधकांचा लोकशाहीतील अधिकार आहे. पण भूतकाळातील भूमिका विसरून चालणार नाही. गतकाळात भाजप-शिवसेना युती तोडण्यात पुढाकार घेतल्याचे छातीठोकपणे सांगणारेही तेच होते. ‘मीच युती तोडली, काही करण्याची वेळ आली की मीच पुढे होतो,’ असे ते स्वतः सांगत. त्यामुळे आजच्या घडामोडींकडे पाहताना त्या भूमिकांचाही विचार व्हायला हवा.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाणार
राजकीय टीका करतानाच गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविषयी वैयक्तिक स्नेह असल्याचेही स्पष्ट केले. “त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वांना बोलवावे. सगळेच येतील. त्यांनी मला निमंत्रण दिल्यास मीदेखील नक्की जाईन. ते माझ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय मतभेद असले तरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी निश्चित जाईन,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सलग सुरू असलेल्या राजकीय भेटीगाठींमुळे त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये पुनरागमन, ठाकरे गटाशी वाढलेला संवाद किंवा अन्य कोणता राजकीय पर्याय स्वीकारला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसली तरी त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे बारकाईने लक्ष लागले आहे.
