जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात वेग घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी नुकतीच त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी खडसेंची सदिच्छा भेट घेतल्यानंतर या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, उत्तर महाराष्ट्रातील बदलती राजकीय समीकरणे आणि भाजपच्या संघटनात्मक हालचालींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे केवळ शिष्टाचार म्हणून न पाहता त्यामागे राजकीय संकेत दडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकनाथ खडसे हे भाजपमधील ओबीसी समाजाचे प्रभावी नेते म्हणून अनेक दशकांपासून ओळखले जात होते. उत्तर महाराष्ट्रात पक्षाची मजबूत संघटना उभी करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान मानले जाते. सलग अनेक वर्षे आमदार, विरोधी पक्षनेते आणि मंत्री, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. मात्र, भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील आरोपानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपमधील त्यांचे राजकीय महत्त्व कमी होत असल्याची भावना त्यांनी अनेकदा उघडपणे व्यक्त केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेले मतभेद, गिरीश महाजन यांच्याशी सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि पक्षातील बदलते सत्ताकेंद्र यामुळे अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यापूर्वीही भाजप प्रवेशाची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर खडसे यांनी भाजपवर सातत्याने टीका केली. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना अधूनमधून उधाण येत राहिले. विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या काळात खडसे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जात असले तरी राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामुळे हा निर्णय पुढे सरकला नाही, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून वेळोवेळी समोर आली होती.
तावडेंच्या भेटीने चर्चांना चालना
अशा परिस्थितीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन घेतलेल्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या तावडे यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. गिरीश महाजन यांचा भाजपमधील प्रभाव कमी करण्यासह आगामी काळात उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाला पुन्हा पक्षात परत आणण्याबाबत केंद्रीय नेतृत्व सकारात्मक असल्याची चर्चा या भेटीनंतर अधिक रंगू लागली आहे.
एकनाथ खडसेंचे हे स्पष्टीकरण
दरम्यान, तावडेंच्या भेटीबाबत स्वतः एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. विनोद तावडे हे सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेण्यासाठी माझ्या मुंबईतील निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी माझीही सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली आणि काही काळ वैयक्तिक विषयांवर चर्चा झाली. या भेटीत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी सूचित केले. मात्र, खडसे यांच्या या स्पष्टीकरणानंतरही राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. कारण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाबाबत सातत्याने चर्चा होत आहेत.
