जळगाव : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. या भेटीमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या शक्यतांवर चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खडसे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना पक्षात कायम ठेवण्यासाठी संघटनात्मक स्तरावर महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप घरवापसीच्या निर्णयाचा परिणाम केवळ त्यांच्या वैयक्तिक राजकीय वाटचालीपुरता मर्यादित राहणार नाही, तर जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीवरही होऊ शकतो. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने वेळ न दवडता खडसे यांची नाराजी दूर करण्याबरोबरच त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
तावडे-खडसे भेटीनंतर नवीन चर्चांना वेग
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर भाजपमध्ये खडसे यांच्या पुनरागमनाची शक्यता पुन्हा चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे मजबूत करण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत खडसे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची घरवापसी भाजपसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राष्ट्रवादीकडून सावध रणनीती
दुसरीकडे, या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानेही सावध भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सातत्याने खडसे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मनधरणीसाठी पक्ष नेतृत्वाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. केवळ खडसे यांच्याशी संवाद साधण्यापुरतेच हे प्रयत्न मर्यादित नसून, त्यांच्या समर्थकांना संघटनेत महत्त्वाची पदे देऊन पक्षाशी त्यांची बांधिलकी कायम ठेवण्यावरही भर दिला जात आहे. या रणनीतीचाच भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक बदलांना वेग आला आहे. बुधवारी जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आली. लाडवंजारी हे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी हे पद भूषविले आहे. जाणकारांच्या मते, ही नियुक्ती केवळ संघटनात्मक बदल नसून खडसे गटाला पक्षात सन्मानाचे स्थान देण्याचा संदेश असल्याचे मानले जात आहे.
उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर परिणाम?
एकनाथ खडसे यांनी अद्याप भाजपमध्ये पुनरागमनाबाबत कोणतेही संकेत दिलेले नाही. मात्र, त्यांच्या एका निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी खडसे हे अजूनही प्रभावी जनाधार असलेले नेते मानले जात असल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत खडसे यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तविली जात आहे.
