जळगाव : जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडवणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार ) ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्याविरोधात सावदा (ता. रावेर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याशी अर्वाच्य भाषेत बोलणे, अरेरावी करणे तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदा परिसरात गौण खनिज चोरी संदर्भातील एका प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर, बुधवारी दुपारच्या सुमारास आमदार एकनाथ खडसे हे स्वतः सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. संबंधित प्रकरणात कारवाई का करण्यात आली नाही, याबाबत त्यांनी कर्तव्यावरील पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी पोलीस ठाण्यात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान खडसे यांनी अधिकाऱ्यांशी बोलताना अर्वाच्य शब्दांचा वापर केला आणि आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे पोलीस ठाण्यातील नियमित शासकीय कामकाजात व्यत्यय आल्याचे नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या सर्व आरोपांचे स्पष्ट शब्दांत खंडन केले आहे. आपण गौण खनिज चोरीच्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आणि संबंधित नागरिकांच्या तक्रारीवरून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. संभाषणादरम्यान अनवधानाने एखादा शब्द चुकीचा निघाला असला तरी त्याबाबत आपण तत्काळ संबंधित पोलीस निरीक्षकांची माफी मागितली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण कोणत्याही प्रकारे शासकीय कामात अडथळा आणलेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारीच दिलासा दिला. पुणे सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यास उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने हा महत्त्वपूर्ण आदेश देत पुढील सुनावणी वेळी आमदार खडसे यांनी संबंधित सत्र न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर राहावे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.