जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप घरवापसीच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु असताना, त्यासंदर्भात खडसे यांनी आता स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. “मला वैयक्तिकरित्या भाजपमध्ये घरवापसी करण्यामध्ये कोणताही रस राहिलेला नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि यापुढेही राहणार आहे,” अशी ठाम भूमिका घेत खडसे यांनी भाजपमधील घरवापसीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, याचवेळी आपल्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचा खुलासा करून त्यांनी राजकीय चर्चांना पुन्हा नवे वळण देण्याचा प्रयत्नही केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या संभाव्य भाजप घरवापसीबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही जळगावमध्ये बोलताना, “त्यांना वरून ग्रीन सिग्नल मिळाला असेल तर आम्हाला काहीच हरकत नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करणारे आम्ही कोण?” असे वक्तव्य केल्यानंतर या चर्चांना अधिक हवा मिळाली. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अखेर आपली भूमिका स्पष्ट केली. “माझा वैयक्तिक भाजप प्रवेशाचा विषय आता संपला आहे. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच राहणार आहे. मात्र, माझ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे खडसे म्हणाले.

शहांनी बोलावले, पण राज्य नेतृत्वाने विरोध केला

भाजपमधील घरवापसीबाबत अधूनमधून होत असलेल्या चर्चांच्या अनुषंगाने एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोटही केला. “लोकसभा निवडणूकीआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच मला दिल्लीत बोलावून घेत भाजपमध्ये प्रवेशाचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर राज्यातील भाजप नेतृत्वानेच माझ्या प्रवेशाला तीव्र विरोध केला. याबाबत स्वतः अमित शहा यांनी मला नंतर सांगितले होते,” असा दावा त्यांनी केला. त्यामुळे भाजपच्या राज्य नेतृत्वानेच म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्या पुनर्प्रवेशाला अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे केला.

गिरीश महाजनांवर खडसेंचा हल्लाबोल

यावेळी खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “गिरीश महाजन आज मोठे नेते असल्याचा आव आणत आहेत. पण एक काळ असा होता की त्यांना भाजपचे तिकीट मिळावे म्हणून मी स्वतः प्रयत्न केले होते. त्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जामनेर व भुसावळ मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आली होती. मंत्री होईपर्यंत त्यांना सर्व प्रकारची मदत मी केली. मात्र, आज ते हे सर्व विसरले आहेत,” अशी टीका त्यांनी केली. महाजन यांच्या राजकीय भवितव्यावरही खडसे यांनी भाष्य केले. “देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंतच गिरीश महाजन यांचे अस्तित्व आहे. ज्या दिवशी फडणवीस यांनी डोक्यावरून हात काढला, त्या दिवशी महाजन कशातच राहणार नाहीत,” असा घणाघात त्यांनी केला.

वाढदिवसाचे सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण

दरम्यान, भाजप प्रवेशाच्या चर्चांदरम्यान आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष सोडण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्यावरील आपली निष्ठा कायम असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी आगामी अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांतील प्रमुख नेत्यांना निमंत्रित केल्याची माहिती दिली. हे सर्व नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.