जळगाव : महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातशी संपर्कात राहण्यावरुन राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनीही एक प्रश्न उपस्थित करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “खरात प्रकरणात त्यांचे नाव अजून कसे आले नाही, असे खडसेंनी म्हटल्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे, या चर्चेला आता तोंड फुटले आहे.

भोंदूबाबा अशोक खरातची पाद्यपूजा केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना आधी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद, त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे चाकणकरांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिल्यानंतरही राजकीय आरोप-प्रत्यारोप अद्याप थांबलेले नाहीत.

अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेतील नामोल्लेखावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, माजी मंत्री दीपक केसरकर तसेच मिलिंद नार्वेकर यांनाही विरोधकांनी टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांचे नावे अजून कसे खरात प्रकरणात आले नाही, अशी उपरोधिक टीका करण्याची संधी आमदार एकनाथ खडसे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना साधली.

यावेळी टीका करताना त्यांनी थेट नामोल्लेख टाळला असला, तरी त्यांचा बोलण्याचा रोख कट्टर प्रतिस्पर्धी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

आमदार खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्यावर जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळात जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकारवर टीका केल्यामुळेच आपल्याला ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप त्यांनी जळगावमध्ये त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना केला. जळगावची पोलीस यंत्रणा राजकारण्यांची बटीक झाली आहे, असेही आमदार खडसे म्हणाले.

आपलेच सरकार, आपलाच मंत्री आणि आपलीच पोलीस यंत्रणा हाताशी धरुन माझ्या चौकशा लावल्या जात आहेत. कोणताही संबंध नसलेल्या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले आहे, असाही आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ज्या साखर कारखान्यावरुन एवढे रान उठवले गेले आहे, त्याच्या संचालकपदी मंत्री गिरीश महाजन आजही कायम असल्याकडेही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

पोलिसांना दोन कोटींचा हप्ता

जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, जीवे ठार मारण्याच्या घटना राजरोसरपणे घडताना दिसत आहेत. मात्र, कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यानंतरही त्याकडे पोलिसांचे अजिबात लक्ष नाही. जवळपास अर्ध्या जिल्ह्याचे पोलिसांना अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी दरमहा दोन कोटी रुपयांचे हप्ते मिळतात. त्यामुळे पोलीस मजेत आहेत, असाही आरोप आमदार खडसे यांनी केला.