जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्यावर जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, विधिमंडळात जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकारवर टीका केल्यामुळेच आपल्याला ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोप आमदार खडसे यांनी येथे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.
भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात २००२ मध्ये तापी-पूर्णा सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली काही शेतजमिनींची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातील गट क्रमांक १२२ ही महार वतनाची शेतजमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीची होती.
जमीन खरेदीच्या वेळी तायडे कुटुंबाला योग्य मोबदला देण्याचे तसेच प्रस्तावित तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याच अनुषंगाने तायडे कुटुंबाला एकनाथ खडसे यांच्याकडून ५१ हजार रुपये आगाऊ देखील मिळाले होते. त्यानंतर तायडे कुटुंबातील सदस्यांचे अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचा व्यवहारही पूर्ण करण्यात आला होता. मात्र, उर्वरित रक्कम मिळावी म्हणून तायडे कुटुंबाने वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना पूर्ण मोबदला देण्यात आला नाही.
दुसरीकडे, अनेक वर्षे उलटूनही संबंधित जागेवर सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला नाही. दरम्यान, २०२५ मध्ये तायडे कुटुंबाने या प्रकरणाची चौकशी केली असता सदर जमीन शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर नोंद झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे धक्कादायक स्थिती निर्माण झाली. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्याकडे मदत मागितली. अडकमोल यांनी प्राथमिक पडताळणी केली असता जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले. यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई म्हणून चमेलाबाई तुकाराम तायडे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार नोंदवली. ज्यामुळे खडसे बाप-लेकी विरोधात ॲट्रासिटीसह फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.
आपले सरकार आणि आपलेच पोलीस
यांसदर्भात पत्रकारांसमोर आपली बाजू मांडताना आमदार खडसे म्हणाले, की जमीन खरेदी प्रकरणात आपला वैयक्तिक कोणताही संबंध नाही. तसेच मुलीने खरेदी केलेली जमीन महार वतन नाही तर वर्ग एक प्रकारातील आहे. खुद्द महसूल मंत्र्यांनी विधिमंडळात त्या बाबतचे स्पष्टीकरण दिल्याचा दावा आमदार खडसे यांनी कागदपत्रांसह केला.
आपण यापूर्वी मुक्ताईनगरातील उपसा योजनेच्या भंगार चोरी प्रकरणासह सावद्यातील मुरुम चोरी प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतरही पोलिसांनी आजतायागत संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, २४ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी तत्परता दाखवून पोलीस मध्यरात्री १२ वाजता गुन्हा दाखल करतात.
जळगावची पोलीस यंत्रणा राजकारण्यांची बटीक झाली आहे, असेही आमदार खडसे म्हणाले. आपलेच सरकार, आपलाच मंत्री आणि आपलीच पोलीस यंत्रणा हाताशी धरुन माझ्या चौकशा लावल्या जात आहेत. कोणताही संबंध नसलेल्या प्रकरणात खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र रचले आहे, असाही आरोप आमदार खडसे यांनी केला. ज्या साखर कारखान्यावरुन एवढे रान उठवले गेले आहे, त्याच्या संचालकपदी मंत्री गिरीश महाजन आजही कायम असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
