नाशिक – उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांना गळाला लावल्यानंतर काही दिवसातच विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांना थेट उपसभापतीपदाची ऑफर देत त्यांना आपल्या पक्षात खेचणारे एकनाथ शिंदे यांनी आता ग्रामीण भागातही उध्दव ठाकरे यांच्या गटातील कोणकोण गळाला लागू शकते, याकडे लक्ष देण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी नाशिककडे मोर्चा वळविला असून ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटातील काही नगरसेवकांना शिंदे गटाकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमकपणे पाऊले उचलण्यात येत आहेत. ठाकरे गट खिळखिळा करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे १५ नगरसेवक असून त्यापैकी १० पेक्षा अधिक नगरसेवकांशी शिंदे गटाकडून संपर्क साधण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ठाकरे गटातील काही नगरसेवकांची शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक झाल्याचेही सांगण्यात येते. विशेष म्हणजे, शिंदे गटात प्रवेशासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रभागनिहाय ५ कोटी रुपयांच्या विशेष निधीचे आमिष दिल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, राज्यातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघातील निवडणुकीवेळी मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि पक्षाचे पदाधिकारी आमदार सुहास कांदे यांच्या संपर्कात अनेक पक्षाचे नगरसेवक आले होते, त्यापैकी कोणी शिवसेनेत प्रवेश करणार असेल तर स्वागतच असल्याचे बोरस्ते यांनी नमूद केले. लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातही अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा अजय बोरस्ते यांनी केला.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’ नाशिकमध्येही सुरु होण्याच्या चर्चेने ठाकरे गटात अस्वस्थता आहे. कोणताही दगाफटका टाळण्याच्या उद्देशाने ठाकरे गटाच्या नगरसेवकांची शुक्रवारी पक्षाच्या गटनेते कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. गटनेते केशव पोरजे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदही घेण्यात आली. केशव पोरजे यांनी आपले म्हणणे मांडले. ” आम्ही सर्वजण एकत्र असून आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही.. केवळ संशयाचे वातावरण तयार केले जात आहे. उपमहापौर पदाचा सौदा केला जात आहे.
उपमहापौर होण्यासाठी जे इच्छुक आहेत, त्यांच्याकडून मध्यस्थांमार्फत आमच्या नगरसेवकांना पाच कोटींच्या प्रभाग निधीचे आमिष दाखविण्यात येत आहे. आतापर्यंत पाच ते सहा नगरसेवकांशी अशाप्रकारे संपर्क साधण्यात आला आहे.” असा आरोप पोरजे यांनी केला. “स्वीकृत नगरसेवक होण्याची इच्छा असलेला एक मध्यस्थ वकील आणि सध्या पक्ष संघटनेतही नसलेली व्यक्ती आमच्या नगरसेवकांशी संपर्क साधत आहे. आमची विकास कामांसाठी अडवणूक केली जात आहे. आम्हांला विकास कामांसाठी निधी मिळावा,
यासाठी आयुक्तांना निवेदन दिले आहे. आमच्या पक्षाचे नगरसेवक फुटल्यास त्यांच्याविरोधात ‘ऑपरेशन तुडवा’ राबविण्यात येईल” असा इशाराही केशव पोरजे यांनी दिला. ठाकरे गटनेत्याच्या कार्यालयात बोलविण्यात आलेल्या बैठकीस ठाकरेंच्या शिवसेनेचे १५ पैकी १३ नगरसेवक उपस्थित होते. मंगला आढाव आणि मुरलीधर भामरे हे दोन नगरसेवक नातेवाईकाच्या निधनामुळे अनुपस्थित राहिले. मुरलीधर भामरे यांच्या वतीने त्यांचे पुत्र तेजस भामरे उपस्थित होते. त्यामुळे सर्व नगरसेवक एक असल्याचा दावा करण्यात आला.
