scorecardresearch

अंधश्रध्देतून वृध्द दाम्पत्याला मारहाण, अंनिसच्या पाठपुराव्याने गुन्हा दाखल

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पाठपुरावा केल्यानंतर हरसूल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंधश्रध्देतून वृध्द दाम्पत्याला मारहाण, अंनिसच्या पाठपुराव्याने गुन्हा दाखल

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्तेजवळील पिंपळाचा पाडा येथील एका व्यक्तीच्या मृत्यूला वृद्ध दाम्पत्यास जबाबदार धरुन भुताळा आणि भुताळीण असल्याचा आरोप करुन त्यांना मारहाण करण्यात आली. याबाबत महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पाठपुरावा केल्यानंतर हरसूल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळाचा पाडा येथील भीमा तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरातमधील मोहपाडा येथे दोन दिवसापूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळमुस्ते या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा तेलवडे आणि त्यांची पत्नी भागीबाई तेलवडे हे जबाबदार असल्याचा आरोप भाऊबंदकीतील काही जणांनी केला. तेलवडे दाम्पत्य भुताळा-भुताळीण असून त्यांनीच मंत्र- तंत्र, जादूटोणा केल्याने हा मृत्यू झाल्याचा दावा करीत काही जणांनी तेलवडे दाम्पत्यास जबर मारहाण केली. मारहाणीत भीमा तेलवडे यांच्या डोक्याला तर, भागीबाई तेलवडे यांच्या छातीला जखम झाली आहे. दोघांनाही मुका मार लागला आहे.

कळमुस्ते गावातील बाळू राऊतमाळे या तरुणाने तेलवडे दाम्पत्यास जखमी अवस्थेत हरसूल पोलीस ठाण्यात आणले. अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. वृद्ध दाम्पत्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यास सूचविले. तेलवडे दाम्पत्यास जबर मारहाण केल्याबद्दलचा गुन्हा दाखल झाला असला तरी इतर कलमांसह जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावण्यात आले नसल्याचे दिसून आले. सोमवारी अंनिसने तातडीने वृद्ध दाम्पत्यास नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करुन ग्रामीण पोलीस अधीक्षकांसमोर आणण्यात आले.

जबर मारहाण झालेले वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी यासंदर्भात माहिती दिली. सात ते आठ वर्षांपासून गावातील काही लोक तसेच भावकीतील काही लोक हे तेलवडे दाम्पत्यास भूताळा-भूताळणी ठरवून त्रास देत आहेत. त्याबद्दल मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, हरसूल पोलिसांना रवि तेलवडे यांनी प्रत्यक्ष भेटून तक्रार दिलेली आहे. तसेच लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. जर या लोकांवर वेळीच कायदेशीर कारवाई झाली असती तर आजचा हा जीवघेणा प्रसंग उद्भवला नसता, अशी खंत वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा रवि तेलवडे यांनी व्यक्त केली. कळमुस्ते येथील तेलवडे कुटुंबाला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, तसेच या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे, असे विनंतीपत्र महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

एखाद्याला भूताळा-भूताळीण, डाकिण ठरविण्यात येत असेल तर अशा अंधश्रद्धायुक्त अवैज्ञानिक,अशास्त्रीय गोष्टींबाबत जबाबदार धरले जाते. त्यातून जबर मारहाण करणे किंवा प्रसंगी जीव घेण्यासारखे प्रसंग उद्भवतात. भूताळीण, डाकिण ठरविलेल्या व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब यांना अशावेळी जगणे मुश्किल होते. ते गाव सोडून दुसरीकडे निघून जातात. जर हे कुटूंब गावात राहिले तरी त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवण्याचे इतर लोक टाळतात. ग्रामीण आणि आदिवासी भागात सातत्याने अशा घटना घडतात. त्यासाठी अशा अंधश्रद्धांच्या विरोधात प्रबोधन करण्यासह जादूटोणाविरोधी कायद्याविषयी पोलिसांसह नागरिकांमध्ये प्रशिक्षण व जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

– डाॅ. टी. आर. गोराणे ( पदाधिकारी, महाराष्ट्र अंनिस)

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 16:10 IST
ताज्या बातम्या