जळगाव : न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील नगर परिषदांसह नगर पंचायतींची मतमोजणी २१ तारखेपर्यंत लांबणीवर पडली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी एकूण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका करताना मधल्या काळात ईव्हीएम हॅक होऊ शकते, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

राज्यासह जळगाव जिल्ह्यात नगर परिषदांसह नगर पंचायतींच्या निवडणुका मंगळवारी पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार होती. परंतु, अपील दाखल केलेल्या काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यानंतर मंगळवारी निवडणुका होत असलेल्या नगर परिषदांचा निकाल आता लांबणीवर टाकण्यात आला आहे. हे सर्व भाजपचे सोयीस्कर राजकारण असल्याची टीका माजी खासदार पाटील यांनी केली.

चाळीसगावमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत बरेच बोगस मतदार समोर आणल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार आणि आयोग यांनी मतमोजणी लांबणीवर टाकून सुरळीतपणे चाललेल्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

न्यायालयाने अपील दाखल असलेल्या काही ठिकाणच्या निवडणुका स्थगित करून पुढे ढकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्यावर प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हाच आपल्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. प्रत्यक्षात, न्यायालयाच्या आदेशाचा दाखल देत राज्य सरकारने दुसऱ्याच दिवशी मतमोजणी लांबणीवर टाकण्याची संधी साधली. काय तर म्हणे निवडणुका पुढे ढकलेल्या काही नगर परिषदांच्या निकालावर त्याचा परिणाम होईल. कशासाठी हवा आहे तुम्हाला मतमोजणी लांबणीवर टाकण्यासाठी इतका मोठा कालावधी, असा सवाल माजी खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला.

मतमोजणी लांबणीवर टाकल्याने ईव्हीएम मशिन हॅक करण्याची शक्यता वाढते. विनाकारण शंका घ्यायला जागा मिळते. मात्र, न्यायालयाच्या आडून सरकार सर्व गोष्टी करत आहे. कशासाठी तुम्ही लोकशाहीच्या या प्रक्रियेत साशंकता निर्माण करतात. यामुळे थेट उपग्रहाद्वारे ईव्हीएम हॅक होतील का, ईव्हीएम मशिनची बॅटरी लेव्हल तोपर्यंत टिकेल का, असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.

निवडणूक यंत्रणेला सुद्धा माहिती नव्हते की मतमोजणी इतकी लांबणीवर पडेल. मशिनची बॅटरी मतमोजणीच्या आधीच संपल्यास ती पुन्हा चार्जिंग होईल का, मशिन परत सुरू करता येईल का, अशाही शंका निर्माण होतात. याला कोण जबाबदार राहील. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्यामुळे मला तांत्रिक गोष्टी ज्ञात आहेत, असेही माजी खासदार पाटील यांनी नमूद केले.