देवळय़ात भाजपचा नगराध्यक्ष

नाशिक : जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या सहा नगरपंचायतींपैकी पाच ठिकाणी नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. बहुचर्चित सुरगाण्याच्या नगराध्यपदासाठी समान मते पडल्याने काढण्यात आलेल्या चिट्ठीचा कौल शिवसेनेच्या बाजूने लागला. कळवण, निफाड, देवळा येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. भाजपच्या ताब्यात एकमेव देवळय़ाचे नगराध्यक्षपद आले. दिंडोरी नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मेधा धिंदळे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल जाधव यांची निवड झाली. पेठ नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे किरण करवंदे, तर उपनगराध्यक्षपदी माकपच्या आफ्रोजा शेख विराजमान झाल्या. निफाड नगरपंचायत अध्यक्षपदी शिवसेनेच्या रुपाली रंधवे, तर उपनगराध्यपदी अनिल कुंदे यांची निवड झाली. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निकालानंतर सर्व ठिकाणी समर्थकांनी एकच जल्लोष केला.

amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
Dhangekar Kolhe and supriya Sule sat in front of the stage in the hot sun.
मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल
Dharashiv Lok Sabha
हाती घड्याळ बांधलेल्या उमेदवारालाच ‘घड्याळा’ची वाढ नकोशी
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात

कळवण नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे कौतिक पगार

कळवण नगरपंचायतीच्या  नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीचे म्हणजेच राष्ट्रवादी गटनेते कौतिक पगार, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या हर्षांली पगार यांची बिनविरोध निवड झाली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेली कळवण नगरपंचायत एकमेव असल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आमदार नितीन पवार यांचे वजन वाढले आहे. नवनिर्वाचितांचा आमदार पवार यांनी सत्कार केला. महाविकास आघाडीच्या कार्यकत्र्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर व शहरात ठिकठिकाणी एकच जल्लोष केला. फटाक्याच्या आतषबाजीत ढोल-ताशांच्या गजरात निवडीचा आंनदोत्सव साजरा केला.  निवडणूक निर्णय अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्या उपस्थितीत निवडीचा कार्यक्रम झाला. नगराध्यक्षपदासाठी कौतिक पगार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नगरसेविका हर्षांली पगार यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.  यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, नारायण हिरे, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते.

देवळा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती आहेर बिनविरोध देवळा नगराध्यक्षपदी भाजपच्या भारती आहेर यांची, तर उपनगराध्यक्षपदी जितेंद्र आहेर यांची बिनविरोध निवड झाली. नगरपंचायत सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सी. एस. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. यावेळी  नगराध्यक्षपदासाठी  भाजपच्या  भारती आहेर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. उपनगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र आहेर यांचाही एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची  निवड घोषित होताच समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

याप्रसंगी गटनेते संजय ऊर्फ संभाजी आहेर, अशोक आहेर , करण आहेर, मनोज आहेर आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा भारती आहेर या माजी सरपंच, बाजार समितीचे माजी सभापती, पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांच्या पत्नी आहेत. नगरपंचायतीत १७ पैकी १५ जागांवर  भाजपचे  उमेदवार विजयी झालेले आहेत. यापैकी  आठ महिला नगरसेवक विजयी झालेल्या आहेत. देवळा नगरपंचायतीचे अध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झालेली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन नगराध्यक्षपदासाठी तोडगा काढला.

सुरगाण्यात शिवसेनेला माकपची साथ

सुरगाणा नगर पंचायतीचे अध्यक्षपद सर्वापेक्षा अधिक जागा असल्याने सहजपणे भाजपला मिळण्याची चिन्हे असताना निवडणुकीच्या दोन दिवस आधी भाजपच्या एका नगरसेविकेचे निधन झाल्याने निवडणूक चुरशीची झाली. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढून निवड करण्यात आली. त्यात शिवसेनेचे भरत वाघमारे यांची अध्यक्षपदी, तर माकपच्या माधवी थोरात यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.  सुरगाणा नगरपंचायतीत भाजप आठ, शिवसेना सहा, माकप दोन, राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल होते. पैकी भाजपच्या नगरसेविका कासूबाई पवार यांचे निवडणूक आधीच दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे भाजपचे संख्याबळ सातवर आले होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. भाजपला राष्ट्रवादीने साथ दिल्याने आठ, तर शिवसेनेला माकपने साथ दिल्याने आठ असे दोन्ही बाजूकडे समान संख्याबळ झाल्याने अखेर चिठ्ठी काढण्यात आली.

अध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे भरत वाघमारे, तर भाजपच्या वतीने विजय कानडे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. अध्यक्ष पदासाठीची चिठ्ठी भूमिका ठाकरे या बालिकेच्या हस्ते उचलण्यात आली. यामध्ये भरत वाघमारे यांच्या बाजूने कौल लागला. उपाध्यक्ष पदासाठी माकपच्या माधवी थोरात आणि राष्ट्रवादीच्या जयश्री  शेजोळे यांनी अर्ज दाखल केला होता. हर्ष चौरे या मुलाने चिठ्ठी उचलली. त्यात माकपच्या माधवी थोरात यांच्या बाजूने कौल निघाला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार सचिन मुळीक, कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, वणीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल रजपूत, बाऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल वाघ, नीलेश बोडके, सागर नांद्रे यांनी बंदोबस्त ठेवला होता.