नाशिक – शहर परिसरातील काही भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नाशिक रोड, एकलहरे परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी सायंकाळपर्यंत सुरळीत होऊ शकला नाही. गुरुवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

शहर परिसरात विजेचा तुटवडा जाणवण्यास सुरूवात झाली आहे. अनेक भागात रोहित्रांवर जादा भार आल्याने, काही तांत्रिक अडचणीमुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे. बुधवारी आकाशवाणी केंद्र, गंगापूर रोड परिसर, पंचवटी, सिडकोसह अन्य भागात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. विद्युत पुरवठा नसल्याने नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. विजेवरील रसवंत्या बंद राहिल्या. व्यावसायिकांनी वीज नसल्याने दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट राहिला.

हेही वाचा >>>महायुतीविषयी महसूल मंत्र्यांच्या बंधूंची नाराजी; निवडणुकीतून माघार, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ

दरम्यान, महापारेषणच्या एकलहरे येथील विद्युत उपकेंद्रातील एकापाठोपाठ एक तीन रोहित्रातील बिघाडामुळे महावितरणची उपकेंद्रे प्रभावित होऊन नाशिकरोड भागातील नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वीज व्यवस्थेतील बिघाडाचा त्रास सामनगाव, दसक, राजराजेश्वरी मंगल कार्यालय, जेलरोड, नाशिकरोड, देवळीगाव, भगूर, शिंदे, पळसे, चेहडी, उपनगर आणि लगतच्या परिसरातील ४० हजारांहून अधिक ग्राहकांना होत आहे.

प्रभावित झालेल्या क्षेत्राला ७० मेगावॉट वीज लागते. सध्या पर्यायी मार्गाने ४० मेगावॉट विजेची व्यवस्था केली जात असून अद्याप ३० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. यासाठी मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी नवे रोहित्र बसविण्यास सुरूवात झाली. बुधवारी सायंकाळी उशीरापर्यंत हे काम सुरू होते. चक्राकार पध्दतीने विद्युतपुरवठा होत आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत होईल असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला.