scorecardresearch

नाशिक: निवडणुकीसाठी केंद्रस्तरीय समित्या मजबूत करण्यावर भर; नाशिक मध्य मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दाव

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीने ज्या जागा पक्षाकडून लढविल्या जाण्याची शक्यता आहे, त्या मतदार संघात केंद्रस्तरीय (बूथ) समित्या मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

jayanat patil राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
(नाशिक येथे आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीने ज्या जागा पक्षाकडून लढविल्या जाण्याची शक्यता आहे, त्या मतदार संघात केंद्रस्तरीय (बूथ) समित्या मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाशिक दौऱ्यात त्या अनुषंगाने मतदारसंघनिहाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रत्येक केंद्रावर आठ ते १० व्यक्तींची नेमणूक करण्याचे सूचित केले. जागा वाटपात आजवर काँग्रेसकडे राहिलेला नाशिक मध्य या मतदार संघावर आता राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दुपारी राष्ट्रवादी भवन येथे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. दोन दिवसांपासून पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी नांदगाव, चांदवड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बुधवारी सकाळी महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी शहरातील पक्ष कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ करोना बाधित असल्याने या दौऱ्यात नव्हते. विधानसभेच्या मध्यावर्ती निवडणुका कधीही होऊ शकतात, हे लक्षात घेत राष्ट्रवादीने त्यादृष्टीने तयारीला वेग दिल्याचे प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यातून अधोरेखीत झाले. राष्ट्रवादी जे विधानसभा मतदार संघ लढण्याची शक्यता आहे, त्या सर्व ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संघटनात्मक पातळीवर चर्चा केली जात असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. पक्ष कार्यालयातील बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>>थकबाकीमुळे विद्यालयाविरुद्ध धुळे मनपाची कारवाई

प्रत्येक मतदार संघातील केंद्रस्तरीय समित्यांची स्थिती पाटील यांनी जाणून घेतली. या समित्या मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. प्रत्येक केंद्रावर आठ ते १० व्यक्ती नियुक्त करण्याची आवश्यकता आहे. एक एप्रिलपासून पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या क्षेत्रात एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रस्तरीय समित्यांची नव्याने बांधणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात या समिती सदस्यांची बैठक घेतली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नाशिक: पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू

कार्यकर्त्यांची मागणी

मागील विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे होता. निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील दुसऱ्या क्रमांकावर होत्या. जवळपास २३ हजार मतांच्या फरकाने भाजपच्या देवयानी फरांदे यांनी त्यांचा पराभव केला होता. आगामी निवडणुकीत जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. या मतदारसंघात पक्षाची ताकद आहे. याच भागातून राष्ट्रवादीचे अधिक नगरसेवक निवडून येतात, असा दाखला बैठकीत दिला गेला. यावर पाटील यांनी थेटपणे कुठलेही भाष्य केले नाही.

Nashik News (नाशिक / उत्तर महाराष्ट्र न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 20:44 IST

संबंधित बातम्या