नोकरदार महिलांची तयार फराळाला पसंती

फराळासाठी लागणाऱ्या रवा, मैदा, पोहे, कुरमुरे, शेंगदाणे, तेल, वेगवेगळ्या प्रकारचे पीठे, तांदूळ, डाळी यांची खरेदी करायला सुरुवात झाली आहे.

करंजी ५०० रुपये किलो, चकली, चिवडा, शेव २०० ते ३०० रुपये

नाशिक : करोनाचे सावट यंदाही कायम असले तरी दिवाळीचे वातावरण तयार होण्यास सुरूवात झाली असून महिला वर्ग दिवाळीचा फराळ तयार करण्याच्या कामाला लागला आहे. मात्र असे असले तरीही अनेक नोकरदार महिलांची तयार फराळास पसंती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी फराळ करायला सुरुवात झाली आहे.

फराळासाठी लागणाऱ्या रवा, मैदा, पोहे, कुरमुरे, शेंगदाणे, तेल, वेगवेगळ्या प्रकारचे पीठे, तांदूळ, डाळी यांची खरेदी करायला सुरुवात झाली आहे. नोकरदार महिला तयार फराळास पसंती देतात. फराळ तयार करण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले तर विशिष्ट मजुरी घेऊन फराळ तयार करून देण्यात येत आहे. असे काम करणारे आचारी किंवा काही महिला यांच्याकडून हे काम नोकरी करणाऱ्या महिलांकडून करून घेण्यात येत आहे. तर काही ठिकाणी फराळ तयार करण्यासाठी लागणारा सर्व किराणा माल घरी मागवून आचाऱ्यांना घरीच बोलावून हे काम केले जात आहे. हे काम करणाऱ्यांकडून प्रति किलो ५० ते ८० रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

आचारी किंवा फराळ बनवून देणाऱ्या महिलांकडून फराळ बनवून घ्यायचा असेल तर प्रथम सर्व साहित्याची तरतूद करावी लागते. अन्य कामाच्या धावपळीत यात बराच वेळ जातो. त्यामुळे काही नोकरदार महिलांचा थेट तयार फराळ खरेदी करण्याकडे कल आहे. चिवडा, शेव, फरसाण, शंकरपाळे, तिखट बुंदी, चकली आदी पदार्थ २०० ते ३०० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. करंजीचा भाव मात्र ५०० रुपयांहून अधिक आहे.

तयार अनारसे महाग असल्याने घरी पीठ आणून ताजे अनारसे करण्याकडे महिलांचा कल आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश येथील आचारी शहरात ठाण मांडून आहेत. रस्त्यालगत मोक्याची जागा पकडून त्यांनी तयार फराळ तयार करून देण्यास सुरूवात केली आहे.

घरगुती फराळ उद्योगात वाढ

करोनाचे सावट यंदाही कायम असून अनेकांच्या हातातील रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत महिलांकडून कुटूंबाला हातभार लावण्यासाठी गृहउद्योग म्हणून घरगुती दिवाळी फराळ करून देण्यात येत आहे. घरातील पुरूष मंडळीही याकामात त्यांना मदत करत आहे. स्वयंपाकाचा गॅस, खाद्य तेल यांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही महिला केवळ तयार भाजणीचे पीठ, शेवेसाठी डाळीचे पीठ, अनारसा पीठ तयार करून देत आहेत.

महागाईतही खरेदीचा उत्साह

गेल्या वर्षाच्या तुलनेत डाळींच्या किंमतीत वाढ झाली असून खाद्यतेलाचेही दरही चढे आहेत. मात्र तरीही दिवाळीसाठी किराणा तसेच अन्य खरेदीचा उत्साह कायम आहे. काहींना तयार फराळ आवडत असल्याने नामांकित खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे तयार पदार्थही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

– सुपर ग्राहक बाजार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Employed women prefer ready made farala akp

ताज्या बातम्या