नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जऊळके येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्ह्यातील पहिली लॅपटॉप प्रयोगशाळा साकारली जात आहे. अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणे होण्यासाठी या प्रयोगशाळेची मदत होणार आहे.

जऊळके येथे पहिली ते सातवीच्या २१० विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि तुकाराम जोंधळे यांच्या विशेष प्रयत्नातून शाळेत २५ लॅपटॉपची प्रयोगशाळा साकारली जात आहे. जिल्ह्यातील ही पहिलीच प्रयोगशाळा आहे.

यावर्षी गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्ताराधिकारी सुनीता आहिरे, केंद्रप्रमुख शरद कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली नालंदा प्रकल्प अंतर्गत इयत्ता तीसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना ४० टॅबच्या माध्यमातून शिकवले जात आहे. करोना कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी शिक्षकांनी स्मशानभूमीत शाळा भरवली. हा उपक्रम लक्षवेधी ठरला. करोना कालावधीत ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी समाज सहभागातून भ्रमणध्वनी, एफएम रेडिओ विद्यार्थ्यांना देण्यात आले. शाळेला मिहद्रा कंपनी आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सुसज्ज व आकर्षक इमारत निर्माण करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्य तुकाराम जोंधळे यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या लॅपटॉप प्रयोगशाळेसाठी आवश्यक कामे वेगाने सुरू असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून २५ लॅपटॉप खरेदी करण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या दर्शनी भागातील भिंतीवर संगणकाच्या कळ फलकाची (की बोर्ड) थ्री डी प्रतिमा साकारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज ज्ञान मिळेल आणि विद्यार्थी संगणकीय कृतीकडे आकर्षित होतील, हा हेतू असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शाळेला भेट देऊन शालेय उपक्रमाचे कौतुक करून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दिंडोरीचे  गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनीही प्रयोगशाळेच्या कामाची पाहणी केली. सरपंच भारती जोंधळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन होऊन विद्यार्थी स्पर्धेच्या युगात अधिक प्रगत व्हावे हा हेतू असल्याचे सांगितले.