गडावरील वीरांच्या समाध्या, सरदारांचे वाडी आदी ऐतिहासिक वास्तूंचे अतोनात नुकसान

नाशिक : सर्वाधिक डोंगरी गडकिल्लय़ांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. रामशेज, हरिहर, पिसोळगड, इंद्राई, हतगड, वाघेरा, खैराई आदी गडकिल्ले येथे असून उपद्रवी लोकांकडून या ठिकाणी होणाऱ्या खोदकामामुळे वीरांच्या समाध्या, सरदारांचे वाडे, सैनिकांचे जोते, राणीवसा यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत वन विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने शेवटच्या घटका मोजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे प्रकार थांबवावे, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून करण्यात येत आहे.

गडकिल्लय़ांच्या परिसरात होणारे खोदकाम, बांधकाम आणि खाणकाम कायमस्वरूपी बंद करावे अन्यथा दरड पडण्याच्या घटना आणि बसणारे हादरे यामुळे मौल्यवान असा ऐतिहासिक वारसा धोक्यात येऊ शकतो. याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी वन, राज्य पुरातत्व, जिल्हा प्रशासन आणि दुर्गसंवर्धन संस्थांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी दुर्ग संवर्धकांच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यतील ६० पेक्षा अधिक गडकिल्लय़ांच्या भूमीत १५ वर्षे अविरतपणे राबणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले.

नाशिकच्या गडकिल्लय़ांवर धनाच्या लालसेपोटी काही स्वार्थी,लोभी उपद्रवी मंडळींकडून किल्लय़ांचे अतोनात नुकसान के ले जात आहे. बागलाण तालुक्यातील पिसोळगडावरील तीन समाध्यांची पूर्णपणे  नासधूस झाली आहे. रामशेज किल्ल्यावर नावालाच उरलेल्या सरदारांचे वाडे, सैनिकांचे जोते मधोमध खोदून ठेवण्यात आले आहेत. इंद्राई किल्लय़ाच्या पायथ्याच्या मंदिरातील मूर्तीच गायब आहे. हतगडचा राणीवसा मधोमध खोल खोदून ठेवला आहे. हरिहर किल्लय़ावरील दगडी मूर्ती गायब आहेत. वाघेरा (त्रंबक) किल्लय़ाच्या आजूबाजूला असलेल्या वनसंपदेला लाकूड माफियांकडून नख लागले आहे.

दरवर्षी सह्यद्रीच्या पर्वत रांगेत लावण्यात येणाऱ्या वणव्यांमध्ये जैवविविधता, वन्यप्राणी, पक्षी नष्ट होत आहेत. याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे. नाशिकच्या गोदावरी पात्रात असलेली गोपिकाबाई पेशवे यांची समाधी,तसेच बलकवडे बंधू समाधी स्थळाचे संवर्धन होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर संबंधित विभागांना सूचना करुन गडकोटांच्या भूमीतील ऐतिहासीक वास्तूंची हेळसांड थांबवावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

आम्ही गेल्या १५ वर्षांंपासून नाशिकच्या भूमीतील गडकिल्ले, बारव, पुरातन समाध्या, वीरगळ यांचे जतन संवर्धनासाठी जीवापाड राबतोय. समाज, सरकार, प्रशासन मात्र सातत्याने दुर्लक्ष करत आहे. आम्ही मोहिमेदरम्यान अभ्यासात्मक श्रमदान करतोय. जिल्ह्यतील असुरक्षित दुर्ग यांचे रक्षण करणे वन, पुरातत्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. किल्लय़ांच्या परिसरात खाणकाम, खोदकाम, लाकूडतोड, वणवे यामुळे निसर्ग, इतिहास याला अतोनात बाधा होते. धनाच्या स्वार्थासाठी उपद्रवी किल्लय़ावरील वास्तूंची मोडतोड करतात. शिवरायांचे दुर्ग सांभाळणे, जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

– राम खुर्दळ  (शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था)