नाशिक – निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह दिल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विभागवार जाहीर सभा घेण्यासाठी मैदानात उतरलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड येथील सभा प्रचंड प्रमाणात यशस्वी झाली. त्यानंतर त्यांची दुसरी जाहीर सभा २६ मार्च रोजी मालेगाव येथे होणार आहे. खेड येथील सभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावची सभाही यशस्वी करण्याचे आव्हान जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमोर असून या सभेसाठी नाशिक महानगरातून अधिकाधिक बळ देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुसार या सभेसाठी महानगरातून २० हजार कार्यकर्ते जातील, अशी अपेक्षा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांना साथ देणारे पालकमंत्री दादा भुसे यांच्या बालेकिल्ल्यात मालेगाव येथे रविवारी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात ठाकरे गटाच्या वतीने विभागवार बैठका घेण्याचे सत्र सध्या सुरू आहे. मालेगावची सभा खेड येथील सभेपेक्षाही विराट करण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. नाशिक महानगरातून अधिकाधिक कार्यकर्ते सभेला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार महानगरात विभागवार बैठकांवर जोर देण्यात येत आहे. बुधवारी नाशिकरोड विभागाची बैठक सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या बैठकीत नाशिकरोड परिसरातून दोन ते तीन हजार कार्यकर्ते सभेसाठी नेण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहनांवर भगवे झेंडे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे छायाचित्र असलेले फलक लावणे, प्रत्येकाने आपल्यासह आपल्या सहकाऱ्यांना घेणे, या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expectation of 20 thousand workers presence for uddhav thackeray meeting in malegaon a success ssb
First published on: 23-03-2023 at 22:00 IST