जळगाव – जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र देऊन मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एका तरूणीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी आणखी बऱ्याच जणांची फसवणूक केल्याचा संशय असल्याने त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.
सायगाव (ता. चाळीसगाव) येथील मूळ रहिवाशी असलेल्या गीता कापडणे (२२) या तरूणीला मुंबई येथील मंत्रालयात कारकुनाच्या नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र संशयितांकडून देण्यात आले होते. सदरचे पत्र थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाममुद्रा आणि स्वाक्षरीसह देण्यात आल्याने तरूणीला ते प्रथमदर्शनी खरे वाटले. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयातील नियमावलीनुसार नियुक्तीपत्रावर स्वतः मुख्यमंत्री कधीच स्वाक्षरी करीत नाहीत. त्यावर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची स्वाक्षरी असते, हे तरुणीच्या नातेवाईकांनी लक्षात आणून दिले.
ज्याने नियुक्तीपत्र मिळवून दिले होते, त्या सर्वेश भोसले याच्याकडे गीताने चौकशी केली. त्याने रणजीत मांडोळे याच्या मदतीने इंटरनेटवर मिळालेल्या मुख्यमंत्र्यांच्या नाममुद्रा पत्रावर मजकूर टंकलिखीत करून देवेंद्र फडणवीस यांची बनावट स्वाक्षरी टाकून नियुक्तीपत्र तयार केल्याचे कबूल केले. या संपूर्ण प्रकारात तिसरा संशयित तुषार उर्फ रोहित बेलदार याचाही सहभाग असल्याचे उघड झाले.
सर्वेश भोसले (रा. चाळीसगाव) याच्यासह रणजीत मांडोळे (रा. खडकी, ता. चाळीसगाव), तुषार ऊर्फ रोहित बेलदार (रा. तांबोळे, ता. चाळीसगाव) या तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत. अशाप्रकारे बनावट नियुक्तीपत्रे तयार करून आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.