नाशिक – शहरात पुन्हा एकदा गुंडगिरी आणि लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. महापालिका निवडणुकीआधी नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांना खास पोलिसी हिसका दाखविण्यास सुरुवात केल्याने शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण एकदमच कमी झाले होते. गुंडांनी नाशिकमधून बाहेर पडणे पसंत केले होते. त्यामुळे नाशिक खरोखर कायद्याचा बालेकिल्ला झाल्यासारखे वाटू लागले होते. नाशिकचे नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर बेहद्द खुश होते.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अभिनंदनाचे फलकही काही संस्था, संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी लावण्यात आले होते. परंतु, महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने कायद्याचा बालेकिल्ला निवडणुकीपुरताच होता की काय, असे वाटू लागले आहे. वाढत्या फसवणुकीचा आणि गुन्हेगारीचा असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक शहरात तोतया पोलिसांकडूनच आता खऱ्या पोलिसांना आव्हान मिळू लागले आहे. तोतया पोलिसांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने सामान्य नागरिकांना कोणता पोलीस खरा आणि कोणता बनावट, हे समजेनासे झाले आहे. नाशिक शहरात तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ महिला आणि नागरिकांना हेरले जाते. प्रामुख्याने ज्यांच्या अंगावर दागिने असतील, त्यांना लक्ष्य केले जाते. ज्येष्ठांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे फसवणूक करुन लुबाडले जात आहे. उपनगर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असे फसवणुकीचे काही प्रकार घडल्यानंतर गंगापूर रोड भागातही असा प्रकार घडला आहे.
गंगापूर रोडजवळील चोपडा लॉन्स परिसरात ७५ वर्षांच्या महिलेची तोतया पोलिसांकडून फसवणूक करण्यात आली. जयश्री चांदगुडे (रा. सुयोग बंगला, लोकमान्यनगर, गंगापूर रोड) या सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास चोपडा लाॅन्ससमोर फिरत असताना दोन तोतया पोलिसांनी त्यांना अडविले. आपण पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. तोतया पोलिसांनी, या भागात एका महिलेच्या गळ्याला चाकू लावून लुटमार करण्यात आल्याची माहिती आम्हांला मिळाली असल्याने तुम्हीही सुरक्षेसाठी दागिने घालून फिरू नका, असा सल्ला त्यांनी जयश्री चांदगुडे यांना दिला. त्यांच्या बोलण्यावर चांदगुडे यांचा विश्वास बसला. त्यांनी आपल्या गळ्यातील सुमारे एक लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र, ४० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, असे एकूण एक लाख ८० हजार रुपयांचे दागिने काढून तोतया पोलिसांना दिले.
तोतया पोलिसांनी दागिने सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देत एका कागदात गुंडाळले. हातचलाखीने दागिने असलेली कागदाची पुडी स्वत:कडे ठेवत दुसरी कागदी पुडी जयश्री चांदगुडे यांच्या स्वाधीन केली. घरी परतल्यानंतर चांदगुडे यांनी कागदी पुडी उघडली असता, त्यात दागिने नव्हते, तर दगड आढळून आले. आपल्याला फसवविण्यात आल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. चांदगुडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहरात तोतया पोलिसांकडून फसवणूक, लुटमारीच्या घटना वारंवार घडत असताना पोलीस असे प्रकार रोखण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पोलिसांनी तोतया पोलिसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

