जळगाव : राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांचा चुलतभाऊ दीपक काशिनाथराव गरुड (५२) यालाही अटक केली आहे. शिरपूर तालुक्यातील विजासनी घाट परिसरातून ताब्यात घेतल्यानंतर दीपकला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या कालावधीत प्रकरणातील आर्थिक व्यवहार, शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रियेची सखोल चौकशी केली जाणार आहे.

नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाकडून सुरू असलेल्या तपासात बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट नोंदी तयार करण्यात आल्याचा संशय असून या प्रकरणात अनेक जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्था, कर्मचारी आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे.

तपासादरम्यान नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणताही शालार्थ प्रस्ताव नसताना करण्यात आलेली नियुक्ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यातून शासनाची सुमारे १६० कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष तपास पथकाने विविध कागदपत्रांची पडताळणी केली. त्यातून समोर आलेल्या धागेदोऱ्यांच्या आधारे दीपक गरुड यांचा शोध घेण्यात आला. आणि त्याला विजासनी घाट परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर अटकेची कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

आर्थिक व्यवहारांचा तपास

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बनावट शालार्थ आयडी तयार करणे, त्याद्वारे वेतन प्रस्ताव मंजूर करून घेणे, शासन निधीचा गैरवापर करणे आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, अशा विविध मुद्द्यांचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कोणकोणाचा सहभाग होता, याचा शोध घेण्यासाठी विविध कागदपत्रे, संगणकीय माहिती आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या घोटाळ्यात सुमारे १,२०० संशयित निष्पन्न झाले आहेत. अनेकांची चौकशी पूर्ण झाली असून काहींकडून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आणखी अटकसत्राची शक्यता

संजय गरुडनंतर त्यांचा चुलतभाऊ दीपक गरुड याची पोलीस कोठडीत कसून चौकशी करून बनावट शालार्थ आयडी तयार करण्यामागील सूत्रधार कोण, त्यासाठी कोणत्या संस्थांचा वापर करण्यात आला, आर्थिक व्यवहार कोणामार्फत झाले आणि या गैरप्रकारातून नेमका किती शासन निधी वळविण्यात आला, याबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच या प्रकरणात आणखी अटकसत्र होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तपास यंत्रणांकडून सांगितले जात आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, पोलीस कोठडीतील चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.