मालेगाव : लहान मुलांमधील वादामुळे कौटुंबिक कलह निर्माण होण्याच्या घटना अवतीभोवती अधून मधून घडत असतात. कालांतराने अशी भांडणे मिटवली देखील जातात. परंतु मालेगावात लहान मुलांच्या अशाच एका भांडणावरून मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. लहान मुलांच्या भांडणावरून कौटुंबिक वाद एवढा विकोपाला गेला की, त्याचे पर्यवसान चक्क गोळीबार करण्यात झाले. यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली व काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

शहराच्या आयेशा नगरातील नवीन इस्लामपुरा भागातील सुफिया मशिदीजवळ हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकाच गल्लीत वास्तव्यास असणाऱ्या दोन कुटुंबांमधील लहान मुलांमध्ये कोणत्यातरी कारणास्तव किरकोळ भांडण झाले. त्यानंतर एकाचे वडिल असलेल्या मेहताब अली याने दहा-बारा साथीदारांना सोबत घेऊन भांडण झालेल्या दुसऱ्या मुलाचे वडिल लईक अहमद मोहम्मद कामील यांचे घर गाठले. यावेळी संशयीताने गावठी पिस्तुलातून आपल्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. परंतु त्याचक्षणी खाली बसल्याने या हल्ल्यातून आपण सुखरूप बचावल्याचे लईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी संशयीतांनी हातात पिस्तूल व धारदार तलवारी मिरवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच या सर्वांनी घरात घुसून आपणास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील सामानाची नासधुस केली. या हल्ल्याच्या वेळी घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकीचे तसेच अन्य चारचाकी वाहनांची संशयीतांनी तोडफोड केल्याचे लईक यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तसेच या गोंधळात लईक यांचा मोबाईल फोन तसेच ५० हजाराची रोख रक्कम गायब झाल्याचाही दावा लईक यांनी केला आहे.

या राड्यानंतर परिसरातील नागरिकांची एकच पळापळ सुरू झाली. त्यातील काहींनी या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच आयेशा नगर पोलिसांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी संशयीत मेहताब अली उर्फ मेहताब दादा यास लागलीच ताब्यात घेतले. त्याचे अन्य साथीदार मात्र पोलिसांचा सुगावा लागताच घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी आयेशा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मेहताब दादा यास अटक करण्यात आली आहे. फरार झालेल्या त्याच्या अन्य साथीदारांचा पोलिसांकडून शोध जारी आहे.

दरम्यान, गावठी पिस्तुलातून गोळीबार होण्याच्या घटना मालेगाव शहरात याआधी बऱ्याच वेळा घडल्या आहेत. यावेळी तर लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून गोळीबार करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात गुन्हेगारांकडे गावठी पिस्तुले कुठून येतात आणि पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागत नाही, याबद्दल लोकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने गावठी पिस्तुले व गुन्हेगारांच्या शोधासाठी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवावे, अशी सूचना देखील नागरिकांकडून केली जात आहे.