राष्ट्रीय पातळीवर सुरगाण्यातील खो-खो

ग्रामीण भागातील अनोळखी चेहऱ्यांना राष्ट्रीय पातळीची ओळख करून देण्याचे काम आता हा खेळ करू लागला आहे.

चंदू सखाराम चावरे आणि रोहन सुभाष वळवी. सुरगाणासारख्या दुर्गम आदिवासी तालुक्यातील ही नावे सर्वाना माहीत असण्याचे काही कारण नाही. परंतु, क्रीडा क्षेत्रात खो-खो सारख्या एका कोपऱ्यातील खेळाशी संबंधितांना ही दोन नावे आता चांगलीच परिचित झाली आहेत. अस्सल मराठमोळ्या मातीतील खो-खो अजून राष्ट्रीय पातळीवर फारसा रूजलेला नसला तरी त्याची वाटचाल संथपणे का होईना, त्या दिशेने सुरू असून ग्रामीण भागातील अनोळखी चेहऱ्यांना राष्ट्रीय पातळीची ओळख करून देण्याचे काम आता हा खेळ करू लागला आहे. चंदू चावरे आणि रोहन वळवी हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. जूनच्या पूर्वार्धात भुवनेश्वर येथे आयोजित १४ वर्षांआतील २७ व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या संघाचा चंदू हा कर्णधार, तर रोहन हा या संघातील महत्वपूर्ण अनुभवी खेळाडू. कोणत्याही खेळात इतक्या लहान वयात महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविण्यास मिळणे हीच मोठी गौरवशाली बाब. त्यात शहरी भागाशी अजिबात परिचित नसलेल्या मुलाने हे पद यशस्वीपणे सांभाळणे हे त्याहून अधिक महत्वपूर्ण. खो-खो मध्ये नाशिकच्या वाटय़ाला हे यश प्रथमच आले.
चंदू आणि रोहन हे दोघेही सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील आश्रमशाळेचे विद्यार्थी. मुळात या शाळेने नाशिक जिल्ह्य़ाला आजपर्यंत इतक्या प्रमाणात खो-खो खेळाडू दिले आहेत की या आश्रमशाळेचे नाव बदलून ‘खो-खो नगरी’ ठेवावे. अर्थात त्यास कारणही तसेच. जमिनीत गाडण्यासाठी लागणाऱ्या दोन लाकडी दांडक्यांव्यतिरिक्त या खेळास इतर दुसरा कोणताही खर्च लागत नसल्याने गरीब मुलांना आणि शाळेलाही हा खेळ सहज परवडणारा.
खोबाळा दिगर हे चंदूचे गाव. आईवडील, दोन भाऊ, दोन बहिणी असे कुटुंब. चावरे कुटुंबाची दोन ते तीन एकर शेती असली तरी एकदा का पावसाळा संपला. मग त्यांच्यापुढे जगण्याची मारामार सुरू होते. चंदू वगळता इतर कोणीच शाळेची पायरी चढलेले नाही. त्यामुळे चंदू महाराष्ट्राचा कर्णधार झाला हे त्यांना समजल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बिल्कूल बदलले नाही. मुळात त्यांना कर्णधार म्हणजे काय, हेच माहीत नाही. त्यामुळे चंदूने कुठपर्यंत मजल मारली यापासून ते दूरच राहिले. प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य दिनी आश्रमशाळेत होणाऱ्या कार्यक्रमांसाठी आईवडील उपस्थित राहतात. तेव्हा मुलाचे होणारे कवतिक त्यांच्यासाठी लाख मोलाचे ठरते. गावापासून जवळ असलेल्या खिर्डी येथे चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यावर पाचवीसाठी चंदूने अलंगुण आश्रमशाळेत प्रवेश घेतला. खो-खो चा श्रीगणेशा त्याने खिर्डी येथेच केला होता. सध्या सातवीत असलेला चंदू दररोज सकाळी साडेसहा ते साडेसात आणि सायंकाळी साडेपाच ते साडेसहा याप्रमाणे दोन तास खो-खो चा सराव करतो. प्रारंभी आक्रमण आणि बचाव या दोघांमध्ये काहीशा कमकूवत असलेल्या चंदूला प्रवीण बागूल आणि विजय वाघेरे या खो-खो ची आवड असलेल्या शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे या दोन्ही क्षेत्रात तो चांगलाच तरबेज झाला आहे. भुवनेश्वरच्या स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतपद मिळवून देताना सात सामन्यात १२ खेळाडू बाद करणे ही कामगिरी त्याचेच फलित म्हणावे लागेल. आश्रमशाळेतीलच दहावीचा विद्यार्थी गणेश राठोडकडूनही त्यांना मार्गदर्शन मिळते.
चंदूचा साथीदार असलेला रोहन वळवी हा सुरगाणा तालुक्यातील गोंदगडचा. अलंगुणपासून गोंदगड सुमारे २५ किलोमीटर दूर. आईवडील, एक भाऊ आणि चार बहिणी असे त्याचे कुटुंब. कुटुंबाच्या चरितार्थाचे साधन अर्थातच शेती. आठवीत असलेला रोहनही चंदुबरोबर महाराष्ट्राच्या संघातून खेळला. शाळेला सुटी लागल्यानंतर आईवडिलांसह गुजरातमधील बिलीमोरिया येथे रोहन बागांमध्ये चिकू काढण्याचे काम करत असतानाच त्याची संघात निवड झाली. त्यामुळे जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव मंदार देशमुख यांच्यासह इतरांनाही थेट बिलीमोरियापर्यंत धाव घ्यावी लागली. फेडरेशन चषक मध्येही रोहन खेळलेला असल्याने प्रत्येक सामन्यात वेगवेगळा अनुभव येत असल्याचे त्याचे म्हणणे. या अनुभवाचा उपयोग पुढील सामन्यात होत असल्याने खेळात अधिक सुधारणा होत असल्याची प्रतिक्रिया रोहनने नोंदवली आहे. स्थानिक शिक्षकांव्यतिरिक्त मंदार देशमुख तसेच इतरांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळेच इथपर्यंत मजल मारता आली असल्याचे चंदू आणि रोहन हे दोघेही उल्लेख करतात. नाशिक जिल्ह्य़ाची खो-खो मधील वाटचाल अशीच सुरू राहिल्यास राज्याच्या संघात नाशिकचा बहुमोल वाटा राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Famous kho kho players of remote tribal area