कुसुमाग्रजनगरी, नाशिक : शिवरायांच्या दरबारात जसे मराठी कवी गौरविले जायचे तसाच सन्मान उर्दू शायरांनाही मिळायचा. कारण, हे कवी- शायर सामान्य माणसांची वेदना आपल्या लेखणीद्वारे मांडत होते. आज त्याच्या अगदी उलट घडत आहे. आताचे राजे त्यांच्या मनाविरद्ध लिहिणाऱ्यांना दंड करीत आहेत. सामान्यांची वेदना लेखणीतून मांडणारा राष्टद्रोही ठरवला जात आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

सामान्यांची वेदना लेखणीतून मांडणाऱ्यांची महाराष्ट्रातील उज्जल परंपरा सांगताना अख्तर यांनी संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, संत एकनाथ आणि हिंदीतील महाकवी कालिदास यांचा दाखला दिला. उत्तम लोकशाहीसाठी राज्यकर्त्यांबरोबरच विरोधक आवश्यक आहेत आणि त्यांच्यापेक्षाही मुक्त नागरिक महत्त्वाचे आहेत. परंतु, आज नागरिकांच्या मुक्त होण्यावर निर्बंध घातले जात आहेत, अनेकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. हे रोखण्यासाठी सर्वानी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन अख्तर यांनी केले. 

मांजराच्या गळ्यात..

लेखक, बुद्धिवाद्यांनी प्रगतीशील लेखक संघासारखे प्रयोग नव्याने केले पाहिजेत. जगभरातील लेखकांना आमंत्रित केले पाहिजे. उधळलेल्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची आहे. ती एकाने बांधता येणार नाही, त्यासाठी सर्वानी मिळून अनेक घंटा मांजराच्या गळ्यात बांधल्या पाहिजेत, असा टोलाही अख्तर यांनी लगावला.