जुन्नर परिसरातील शेतकऱ्याची कहाणी
पाच वर्षे झाली. शेतात मोठय़ा उमेदीने पीक घेतोय, पण मालाला भावच मिळत नाही. राजकारण्यांचं काय जातंय कर्जमुक्ती आणि कर्जमाफी असा शब्दाचा खेळ करायला? ..एकदा डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला की कळतं क्षणात सारे कसे परके होतात. पैसा हाती राहावा यासाठी मग सुरू होतो उधार उसनवारीचा खेळ. त्यालाच कंटाळलो आणि आत्महत्येचा निर्णय घेऊन घराबाहेर पडलो आणि शेतकरी बचाव अभियनाच्या कार्यकर्त्यांची भेट झाली. त्यांनी केलेल्या उपयुक्त अशा मार्गदर्शनामुळे माझा आत्महत्या करण्याचा निर्णय क्षणात बदलला, अशा भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केल्या.




पुण्याच्या जुन्नर परिसरातील आळेफाटा या बागायती पट्टय़ातील हा शेतकरी. समाजमाध्यमांवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे शेतकरी बचाव अभियानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्याला नाशिक परिसरात धुंडाळत आत्महत्या करण्यापासून रोखले. या निर्णयाप्रत येण्याची वेळ का आली, याची माहिती संबंधिताने कथन केली. त्या वेळी कृपया आपले नाव प्रसिद्ध करू नका अशी त्याची कळकळीची विनंती होती.
पोटापाण्यासाठी वडिलोपार्जित शेती केली. चारचौघांसारखा संसार बहरला. एक मुलगा व एक मुलगी, पत्नी यांच्या सुखासाठी शेतात राबायचे. स्वत:ची सव्वा एकर शेती कमी पडते म्हणून गावातील सहा एकर शेती कसायला घेतली.
जेणेकरून कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील ही आशा. शेती वाढली तसा त्या मागचा खर्च वाढत गेला. वेगवेगळे प्रयोग करताना आंतरपीकमध्ये धान्य, फळे, थोडय़ा प्रमाणात भाजीपाला घेतला.
प्रारंभी काही पैसे हाती पडले. त्यामुळे अजून काही चांगले करता येईल या विचाराने गावातील विकास संस्था, पतपेढीमधून कर्ज उचलले. शेतीवर मुलांचे शिक्षण, त्यांच्या गरजा, घरातील सण-समारंभ यासाठीचा खर्च निभावणे मुश्कील झाले. तेव्हा काही मित्रांकडून काही लाखांची उसनवारी केली. हा कर्जाचा आकडा सध्या १४ लाख रुपयांपर्यंत आला.
कर्जाचा डोंगर वाढत असताना शेतीतील उत्पन्न अंतर्धान पावले. पाच वर्षांपासून केवळ शेतात राबतोय. दिवस-रात्र काम करतोय, पण हाती काहीच पडत नाही. कुटुंबातील काही सदस्य काय करता तुम्ही, असा प्रश्न विचारत बोट दाखवितात. दुसरीकडे सोसायटीत व्याजाचा आकडा वाढतोय.
उधार उसनवारीवाले दारातही उभे करत नाही. जवळच्या लोकांनी पैसे मागण्यासाठी तगादा सुरू केला.. काय करायचे, जप्तीची नोटीस आली आणि विचार केला आत्महत्या करत हे दुष्टचक्र भेदायचे. मुलांचे हिरमुसलेले चेहरे पाहत घर सोडले. निघताना केवळ जवळच्या मित्राला फोनवरून सांगितले. मी कंटाळलोय आता जीव द्यायला चाललोय. तसा पोहोचलो गोदेच्या किनाऱ्यावर.
या चार दिवसांत काय करायचे समजत नसल्याने काळाराम मंदिरात बसून राहिलो. त्याच वेळी शेतकरी बचाव अभियानाची ही मंडळी आली. त्यांना कसे कळाले माहीत नाही. पण त्यांच्या बोलण्याने धीर आला.. असे सांगत त्याने आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली. याच वेळी त्यांचा पुणे येथील मित्र समोर पाहून डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला.
अभियानाचे यश
नाशिक येथील शेतकरी बचाव अभियानाचे राजू देसले यांना सोमवारी त्यांच्या मित्राचा फोन आला. त्याचा जवळचा शेतकरी मित्र जुन्नर येथून आत्महत्या करण्यासाठी नाशिकला आल्याचे समजले. संबंधित शेतकऱ्याचे छायाचित्रही समाजमाध्यमावर मिळाले. ही माहिती मिळाल्यावर अभियानचे देसले, राम खुर्दळ, श्रीराम निकम, नाना बच्छाव, प्रा. सोमनाथ मुठाळ, प्रकाश चव्हाण असे सारे जण शोधमोहिमेवर निघाले. ठिकठिकाणी त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन-अडीच तासांच्या अथक प्रयत्नाने हा शेतकरी सापडला. त्यांना घेऊन सर्वानी अभियानचे कार्यालय गाठले. आजवर अभियानने असंख्य प्रकरणे हाताळली असून अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त केले असल्याचे देसले यांनी सांगितले.