कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन

कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल हमी भाव द्यावा आणि दुष्काळात हतबल झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालत आंदोलन केले. महिला वर्गही आंदोलनात सहभागी झाला होता. यावेळी कांद्याच्या माळा जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा आंदोलकांचा प्रयत्न होता. परंतु, पोलिसांनी अटकाव केल्यामुळे तो यशस्वी झाला नाही.

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनास आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यंदा राज्यात सर्वत्र दुष्काळ पडला असतांना अनेक पर्याय शोधून गोदावरी काठावर जाऊन किंवा पाणी असेल त्या ठिकाणी कांद्याचे पीक घेतले. त्यासाठी जमीन मालकाला एकरी २० ते २५ हजार रुपये भाव देण्यात आला. जागा भाडे, मजुरी, पाणी भरणे, लागवड ते कांदा काढून मुख्य बाजार समितीमध्ये किंवा चाळीत आणेपर्यंत शेतकऱ्याला किमान एक लाख रुपये खर्च आला आहे. आज उन्हाळी कांदा ४०० ते ५०० रुपये क्विंटल भावाने विकला जात आहे. वास्तविक, त्याचा उत्पादन खर्च ७०० रुपये क्विंटलहून अधिक आहे. या स्थितीत पीक हाती येईपर्यंतचा खर्च कसा निघणार, असा प्रश्न आंदोलकांनी केला.

तसेच, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज मुक्ती करावी, आत्महत्या थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल हमी भाव देऊन शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याच्या फरकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, वीज बिल वसुली थांबवावी, शेतीमाल निर्यातीवरील र्निबध हटवावेत आदी मागण्या करण्यात आल्या. रत्ना भोसले, शकुंतला जाधव, शांताबाई जाधव आदी उपस्थित होते.