प्रशासनाच्या दबावतंत्रास शेतकऱ्यांचा विरोध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांद्याचे व्यवहार आणि साठय़ाची दैनंदिन माहिती न दिल्यास व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर शुक्रवारी त्याचे भाव २०० ते ३०० रुपयांनी गडगडले. देवळा बाजार समितीत सकाळी भाव कमालीचे गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला. लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला २२५० रुपये भाव मिळाला. जिल्हा प्रशासनाच्या दबाव तंत्राविरोधात शेतकरी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. जिवनावश्यक वस्तुंच्या यादीत कांद्याचा समावेश नसताना प्रशासन त्याची भीती दाखवत असल्याचा आरोप नाफेडच्या माजी उपाध्यक्षांनी केला. महानगरांमध्ये कांदा स्वस्त देण्यासाठी सरकार व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवत असल्याचे आरोपही होत आहे.

परराज्यातून कांद्याची मागणी वाढू लागल्याने कांद्याचे दर काही दिवसांपासून उंचावत आहे. पावसामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश व राजस्थानमधील कांद्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे सर्व राज्यांची भिस्त महाराष्ट्र व प्रामुख्याने नाशिकमध्ये साठविलेल्या उन्हाळ कांद्यावर आहे. नवीन लाल कांदा बाजारात येण्याच्या मार्गावर असताना परतीच्या पावसाचा त्याला फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या स्थितीत पुढील काळात कांद्याचे भाव आणखी भडकणार असल्याची अटकळ बांधली जात असताना प्रशासनाने कांदा व्यापारी व बाजार समिती पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कांदा खरेदीचा दैनंदिन अहवाल सादर करण्यास सूचित केले. व्यापाऱ्यांनी चाळीत किती कांदा साठविला, किती कांदा बाहेर पाठविला याची माहिती देणे बंधनकारक आहे. जे व्यापारी माहिती देणार नाहीत, त्यांच्याविरुध्द कारवाईचा इशारा दिला गेला आहे. या घडामोडीनंतर शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत कांद्याचे भाव घसरले. देवळा बाजार समितीत सकाळच्या सत्रात आदल्या दिवशीच्या तुलनेत ५०० ते ७०० रुपये कमी भाव पुकारले गेले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कळवण-देवळा रस्त्यावर तासभर रास्तारोको केला. लिलावही ठप्प झाले. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनुसार भाव देण्यास व्यापाऱ्यांनी संमती दिल्यावर दुपारच्या सत्रात लिलाव सुरळीत झाले. त्यावेळी कांद्याला सरासरी प्रति क्विंटलला २१५० रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीत आदल्या दिवशीच्या तुलनेत भाव १५० रुपयांनी घसरले. शुक्रवारी उन्हाळ कांद्याची २५ हजार क्विंटल आवक होऊन त्यास २२५० रुपये सरासरी भाव मिळाला. कांदा बाजारपेठ नियंत्रित करण्यासाठी चाललेल्या हालचालींमुळे शेतकरी रोष प्रगट करत आहे.

आंदोलनाचा सुप्रिया सुळे यांचा इशारा

कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार व प्रशासनाने दबाव तंत्राचा वापर केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्याला रस्त्यावर उतरून कडाडून विरोध करेल, असा इशारा खा. सुप्रिया सुळे यांनी दिला. महागाई वाढली असताना सरकारने दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिकेवरील साखर काढून घेतली. महानगरांमध्ये कांद्याचे दर वाढू नये म्हणून व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असेही त्यांनी सूचित केले.

 

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers rasta roko against onion rate down on kalwan deola road
First published on: 14-10-2017 at 04:46 IST