जळगाव : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागात राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. या कारवाईत जळगाव शहरातील दोन हॉटेल्सचे परवाने तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून, भुसावळ तालुक्यातील एका हॉटेलवरही कारवाई करण्यात आल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी मात्र एफडीएच्या कारवाईचे कौतुक केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक केलेल्या तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्समध्ये अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या. स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची कोल्ड स्टोरेज व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, शिजविलेले आणि कच्चे अन्न एकत्र साठविणे, कालबाह्य अथवा लेबलविरहित साहित्याचा वापर, तसेच स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र तपासणीदरम्यान समोर आले.

अनेक कर्मचाऱ्यांनी हातमोजे, हेडकॅप किंवा अॅप्रनचा वापर केला नसल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याशिवाय कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नसणे, आवश्यक नोंदी व कागदपत्रे उपलब्ध नसणे, ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी कोणतीही व्यवस्था नसणे आणि अन्न हाताळणीबाबत आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव अशा अनेक त्रुटीही आढळल्या.

परवाना नसलेल्यांवर देखील कारवाई

तपासणीदरम्यान चार अन्न आस्थापनांकडे वैध अन्न व्यवसाय नोंदणी अथवा परवाना नसल्याचे उघड झाले. परवाना नसताना अन्न व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित आस्थापनांना वैध नोंदणी अथवा परवाना मिळेपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आले. नियमांचे पालन केल्याशिवाय या आस्थापनांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेत जळगाव शहरातील अजिंठा रोड, एमआयडीसी परिसरातील हॉटेल त्रिमूर्ती आणि हॉटेल भानू या दोन हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील हॉटेल जय हॉटेलवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहतील. नाशिक विभागात सुरू करण्यात आलेली ही विशेष मोहीम आगामी काळात अधिक व्यापक करण्यात येणार असून, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, मिठाई दुकाने, बेकरी तसेच अन्य अन्न आस्थापनांची नियमित आणि अचानक तपासणी केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अन्न व्यवसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.