नाशिक – स्पर्धा परीक्षेसाठी अवघ्या दोन मिनिटांचा उशीर झाल्याने महिला उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आयुक्तालयांतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी १२ मार्च रोजी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ८:३० पर्यंत हजर राहण्याची सूचना देण्यात आली होती. परीक्षा केंद्र नाशिकरोड परिसरातील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी स्कूल येथे होते. परीक्षेची वेळ सकाळी नऊ ते ११ अशी होती. सिन्नर येथील महिला उमेदवार सकाळी ८:३२ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचल्या. त्यावेळी प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. अधिकाऱ्यांकडे विनंती करूनही महिलेला केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही. वाहतूक कोंडीमुळे दोन मिनिटांचा उशीर झाल्याचे महिलेने सांगूनही प्रशासनाने परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही.
या घटनेमुळे इतर परीक्षार्थींमध्ये नाराजी पसरली. परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा निर्णय धक्कादायक असून, प्रशासनाच्या आडमुठे धोरणावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फक्त दोन मिनिटे उशिरा पोहोचल्याने परीक्षेपासून वंचित ठेवणे हा अन्याय असल्याचे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी, यासंदर्भात कोणताही प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थ्यांनी आता शासनाकडे याबाबत तक्रार करण्याची तयारी केली आहे. ही घटना परीक्षेतील नियमांची कठोर अंमलबजावणी दाखवते, पण मानवीय दृष्टिकोनाचा अभाव असल्याचाही आरोप होत आहे.
मला परीक्षा केंद्रावर पोहचण्यास पाच मिनिटांचा उशीर झाला. एका विद्यार्थिनीला चार मिनिटे तर तिसऱ्या एका मुलीला केवळ दोन मिनिटे उशीर झाला. आमचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. परीक्षेला बसू देण्यात आले नाही. परीक्षा नऊ वाजता सुरू होणार होती. यापूर्वी परीक्षा आयोजकांकडून अनेक चुका झाल्या आहेत. परंतु, त्यावर मात्र दंडात्मक कारवाई झालेली नाही.- तेजस्विनी पिंगळे (परीक्षार्थी)