खड्डे बुजवा अन्यथा सत्ताधाऱ्यांच्या घरासमोर खड्डे करू

शहरात विविध कारणांसाठी खोदकाम झाले असून मुसळधार पावसाने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भाजपला इशारा

नाशिक : शहरातील रस्त्यांवरील सर्व खड्डे येत्या पंधरा दिवसांत बुजवावे अन्यथा महापौरांचा शासकीय ‘रामायण’ बंगला, स्थायी समिती सभापती आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या घरासमोर खड्डे खणण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.

शहरात विविध कारणांसाठी खोदकाम झाले असून मुसळधार पावसाने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यावरून महापालिकेत आधीच गदारोळ झालेला असताना आता खड्ड्यांवरून सत्ताधारी भाजपला खिंडीत काढण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. स्मार्ट सिटीचा टेंभा मिरविणाऱ्या संपूर्ण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसात रस्त्यांवर पडलेले खड्डे व गॅस वाहिनी, अन्य कामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले आहते. खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघात घडत असल्याकडे राष्ट्रवादी

युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी लक्ष वेधले.

कोट्यवधी रुपयांचे रस्ते एकाच पावसात खड्डेमय झाल्याने खुद्द भाजप आमदारांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यावेळी पालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यांत माती व मुरूम टाकून मलमपट्टी केली. परंतु पावसाने माती वाहून जात सर्वत्र चिखल झाला आहे. खड्डे बुजविण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे आंदोलने केली गेली. तथापि, सत्ताधारी भाजपने याकडे लक्ष दिले नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहे. खड्डेमय रस्त्याने आरोग्याचे प्रश्नही सतावत असल्याचे खैरे यांनी सांगितले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fill the pits otherwise we will make pits in front of the houses of the authorities ncp youth congress warns bjp akp