नाशिक : सरकारने बंदी घातली असतानाही एकल वापर प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत असल्याने महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. नाशिकरोडचे दोन दुकानदार आणि एका प्रसिध्द हॉटेल चालकावर कारवाई करुन २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विभागीय अधिकारी सुनील आव्हाड आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांनी दिली.

एकल वापर प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांकडून दररोज तपासणी करण्यात येत आहे. बिटको चौकातील कपडय़ाच्या दुकानात पथक गेले असता त्याठिकाणी प्लास्टिक आढळले. त्यामुळे दुकानदाराला समज देऊन पाच हजाराचा दंड करण्यात आला. जेलरोडचा दुकानदार आणि नाशिकरोडच्या हॉटेल व्यावसायिकालाही प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला. एकल वापर प्लास्टिकची विक्री आणि वापर करणाऱ्यांना पहिल्यांदा पाच हजाराचा दंड आकारला जातो. दुस-यांदा पुन्हा प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास अशी शिक्षा करण्यात येत आहे.

२०१६ मध्ये प्लास्टिक बंदीचा कायदा झाला. सरकारच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आली. तरीही नाशिकरोड आणि शहरात दुकानदार, दूध विक्रेते, फेरीवाले, भाजीवाले यांच्याकडून प्लास्टिकचा सर्रास वापर सुरु आहे. त्यावर नियंत्रणासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आवेश पलोड, उपायुक्त दिलीप मेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर कारवाई सुरु झाली आहे. नाशिकरोडला विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, अशोक साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके दररोज अस्वच्छता, प्लास्टिक, घाणीसह माती ढिगारे प्रकरणी कारवाई करत आहेत. व्यावसायिक, नागरिकांनी याबाबतचे नियम पाळून कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.