scorecardresearch

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानामुळं संजय राऊत अडचणीत; नाशिकमध्ये गुन्हा दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

Sanjay-Raut-Eknath-Shinde
एकनाथ शिंदे संजय राऊत ( संग्रहित छायाचित्र )

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्याता आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणत बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्याता आला आहे.

प्रकरण काय आहे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पुणे दौऱ्यात ‘मोदी @ २०’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात अमित शाह यांनी युपीए सरकार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे ‘तळवे’ चाटले असंही वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. या टीकेला उत्तर देत असताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची चाटत आहेत. अशी चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?

अमित शाह यांच्या तळवे चाटले या वक्तव्याबाबत बोलत असताना राऊत म्हणाले की, हे लोक काय चाटत आहेत. अशी चाटुगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. हे चाटुगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटुगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जात आहे, ते आम्हाला न्याय देत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अपशब्द वापरण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे बोलत असताना संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतला. “राजकारणाची पातळी कुणी कितीही सोडली असली तरी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते योग्य वेळी उत्तर देतील. मी पातळी सोडणार नाही. आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही. आरोपांना कामातून उत्तर देणार. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दिवसरात्र काम करणार. ते लोक जेवढे आरोप करतील, त्याच्या दहापट काम मी करणार”, असे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 08:18 IST
ताज्या बातम्या