scorecardresearch

Premium

महालक्ष्मीनगर परिसर पुन्हा चर्चेत

अंबडमधील महालक्ष्मीनगर भागात गेल्याच आठवडय़ात दोन वेळा वाहन जाळपोळीचे प्रकार घडले होते.

  अंबड परिसरातील स्वामीनगर येथे आगीमुळे दुकानाचे झालेले नुकसान.
  अंबड परिसरातील स्वामीनगर येथे आगीमुळे दुकानाचे झालेले नुकसान.

किराणा मालाची टपरी आगीत भस्मसात

गेल्या आठवडय़ात ज्या अंबडच्या महालक्ष्मीनगर भागात सलग दोनदा वाहन जाळपोळीच्या घटना घडल्या आणि त्या प्रकरणी संशयितांना जेरबंद केल्याचे सांगितले जात असतानाच याच परिसरात मंगळवारी रात्री पुन्हा किराणा मालाच्या टपरीला आग लागल्याने वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार दहशत पसरविण्याच्या उद्देशाने टपरी पेटवून दिली तर पोलिसांनी ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही आग लागल्याचे सांगत या संदर्भात वीज कंपनी आणि अग्निशमन दलाचा अहवाल मागवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे टपरीचा वीज पुरवठा आजही सुरळीत असून तसे काही घडले असते तर तो खंडित झाला असता, याकडे तक्रारदाराने लक्ष वेधले आहे. पोलीस व तक्रारदाराच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे संशयाचे धुके गडद झाले आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

अंबडमधील महालक्ष्मीनगर भागात गेल्याच आठवडय़ात दोन वेळा वाहन जाळपोळीचे प्रकार घडले होते. त्यात एकूण १२ दुचाकी जळून भस्मसात झाल्या. इमारतींचे नुकसान झाले होते. या प्रकरणी अंबड पोलिसांनी आकाश दौलतराव दातीर (२२, अंबड गाव), लल्लन उर्फ सजिन सिताराम सिंग (२०, रा. सर्वेश्वर रो हाऊस, स्वामीनगर), अनील भिमराव देहाडे (१९, ) आणि विनोद संजय जाधव (२०, डीजीपीनगर) यांना जेरबंद केले. या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळाल्याची माहिती पोलिसांनी देऊन काही तास होत नाही तोच उपरोक्त परिसरात पुन्हा टपरीला आग लागल्याचा प्रकार घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महालक्ष्मीनगरपासून २०० ते ३०० मीटर अंतरावरील स्वामीनगर येथे लक्ष्मीकांत अदबे यांची किराणा मालाची टपरी आहे. मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री दोन वाजता अदबे यांचा मुलगा सुहासच्या भ्रमणध्वनीवर टपरीला आग लागल्याचे मित्राने सांगितले. उपेंद्रनगर येथे वास्तव्यास असणारे अदबे हे मुलाला घेऊन तातडीने दुकानाकडे पोहोचले. त्यावेळी स्थानिक नागरिक घरातून पाणी आणून आग विझवत होते. तत्पुर्वी, या घटनेची माहिती पोलीस व अग्निशमन विभागालाही दिली गेली.

टपरीच्या शेजारी विद्युत रोहित्र असल्याने तिचे लोखंडी दार न उघडता आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन विभागाचा बंब उशिराने दाखल झाला. त्यांनी आग आटोक्यात आणली. पण, तोपर्यंत दुकानातील सर्व किराणा माल आणि लाकडी फर्निचर भस्मसात झाले होते, असे अदबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. गेल्याच आठवडय़ात नागरिकांनी इमारतीच्या वाहनतळावरील वाहनांचे अग्निकांड अनुभवले होते. त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली की काय, अशी धास्ती स्थानिकांमध्ये आहे. बुधवारी सकाळी नागरिक या विषयावर फारसे बोलण्यास तयार नव्हते. वाहनांच्या जाळपोळीच्या घटनेनंतर स्थानिकांच्या मागणीनुसार दोन दिवसांपूर्वी परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली. उपरोक्त प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी जेरबंदही केले. असे असताना पुन्हा तसाच प्रकार घडल्याची साशंकता व्यक्त करण्यात आली.

पोलिसांची दडपादडपी का ?

दहशत पसरविण्याच्या उद्देशाने टपरीची जाळपोळ झाल्याची शक्यता खुद्द तक्रारदाराने व्यक्त केली असताना पोलिसांनी हा ‘शॉर्ट सर्किट’चा प्रकार असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यास तक्रारदाराने आक्षेप घेऊन हा जाळपोळीचाच प्रकार असल्याची तक्रार देऊन गुन्हेगारास पकडून कारवाई करण्याची मागणी केली आहे. टपरीच्या मागील बाजूस एक घर आहे. तेथून विजेची जोडणी घेण्यात आली आहे. आग लावली तेव्हा टपरीतील वीज पुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आला. असे असताना ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली असे कसे म्हणता येईल, असा प्रश्न करत तक्रारदाराने कोणीतरी दहशत पसरवण्यासाठी ती लावल्याची शक्यता व्यक्त केली.

हा तर ‘शॉर्ट सर्किट’चा प्रकार

टपरीला लागलेली आग हा जाळपोळीचा प्रकार नाही. टपरीची आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अवलोकन केल्यावर उन्हामुळे वायर तापून त्या परस्परांना चिकटल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. टपरीत फटाके ठेवण्यात आले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यावर या फटाक्यांनी पेट घेतला. त्यामुळे आगीची तीव्रता वाढली. या संदर्भात अग्निशमन दल आणि वीज कंपनीच्या अभियंत्याकडून अहवाल मागवला जाईल. तुर्तास या घटनेची अकस्मात म्हणून नोंद केली जाणार आहे. वाहन जाळपोळीच्या घटनेतील काही संशयित स्वामीनगर भागातील रहिवासी असले तरी संबंधितांवर कठोर कारवाई झाल्यामुळे त्यांचा या घटनेशी कोणताही संबंध असण्याची शक्यता नाही.

– दिनेश बर्डिकर (पोलीस निरीक्षक, अंबड)

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-05-2016 at 03:46 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×