नाशिक – तीन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर शहर परिसरात पावसाचे आगमन झाले. आणि कुंभमेळ्याच्या कामांसाठी सर्वत्र झालेल्या खोदकामांमुळे निर्माण झालेल्या संकटांची जाणीव शहरवासीयांना झाली. नऊ तासांत शहरात १८.९ मिलीमीटर पाऊस पडला. पहिल्याच संततधारेत अनेक रस्त्यांवर पाणी आले. खोदकामांमुळे वाहतुकीसाठी खुल्या असणाऱ्या रस्त्यांची बिकट अवस्था झाली. अनेक प्रमुख चौकात, रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. चिखलमय माती, मुुरूम रस्त्यावर आल्याने वाहनधारक घसरण्याचे प्रकार घडले.
अलीकडेच खुल्या केलेल्या द्वारका चौकात अवघ्या काही तासांत आठ ते नऊ वाहनधारक घसरले. गंगापूर रस्त्यावर सोमेश्वर भागात तसेच अन्य काही रस्त्यांवर खोदलेल्या भागात पाणी साचून वाहनधारकांसाठी धोकादायक स्थिती निर्माण झाली. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
उन्हाने होरपळून निघालेल्या नाशिककरांना मंगळवारी पावसाचे आगंमन झाल्यामुळे दिलासा मिळाला. हवामान विभागाने मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जनेसह आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची दाट शक्यता वर्तविली होती. सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. पंचवटी, पाथर्डी फाटा, सिडको, मखमलाबाद, गंगापूरसह आसपासच्या परिसरात त्याचा जोर अधिक होता. इतरत्र दिवसभर संततधार होती. सकाळी साठेआठ ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत १८.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई नाका, सिडकोत वीज खांबावर झाडाच्या फांद्या कोसळल्या. पावसाने अनेक भागातील रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले.
खोदलेल्या रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरुस्ती झालेली नाही. जिथे झाली, तिथे मुरूम व मातीचा भराव टाकला गेला. या सर्वाचा फटका वाहनधारकांना बसला. काही ठिकाणी वाहने पाण्यात अडकली. पाथर्डी भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनधारकांना रस्त्याच्या काठावरून जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागले. काही दिवसांपूर्वी द्वारका चौकातील एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. तिथे मुरूम टाकून दुरुस्ती झाल्यामुळे आठ ते १० वाहनधारक घसरले. यात पाच ते सहा महिला वाहनधारक असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. त्र्यंबक रस्त्यासह इतरत्र असेच प्रकार घडले.
सर्वत्र वाहतूक कोंडी
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने २८ प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्यासह अनेक रस्त्यांवर ‘युटिलिटी’ अर्थात उपयोगिता सेवांसाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेले रस्ते मुरूम, मातीचा भराव टाकून समतल करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केलेली होती. तथापि, अनेक ठिकाणी त्याचे पालन झाले नाही. जिथे दुरुस्ती झाली, तिथे माती व मुरूम रस्त्यांवर आहे. या सर्वाची परिणती पहिल्याच पावसात खड्डेमय व खोदलेल्या रस्त्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीत झाली.
मुंबई नाका, आडगाव नाका, एबीबी चौक ते पपया नर्सरी या ठिकाणी सर्वत्र वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्या. अनेक रस्त्यांवर खोदकामाची दुरुस्ती केलेली नाही. तिथे पावसाचे पाणी साचून धोकादायक स्थिती निर्माण झाली. जेहान चौकालगत खोदलेल्या मातीचा भराव तसाच पडलेला आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत आहेत. मुसळधार पावसात काय होईल, याची धास्ती नागरिकांना वाटत असून महापालिकेच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्र्यंबक रस्ता लवकरच खुला होणार
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खडकाळी ते आयटीआय तसेच आयटीआय ते मनपा हद्दीपर्यंत तसेच त्र्यंबक नाका ते बॉश सर्कल आणि आयटीआय सिग्नल ते सातपूर गाव या टप्प्यातील कॉक्रिटीकरणाचेा काम जवळपास पूर्ण झाले असून हा मार्ग लवकरच नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन मनपा आयुक्त मनीषा खत्री प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पात बॉन्डेड ‘व्हाईट टॉपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून विद्यमान डांबरी रस्त्यावरच काँक्रिटचा नवीन थर टाकण्यात येत आहे.
आयुक्तांनी संबंधित कंत्राटदारांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. रस्त्याची स्वच्छता तसेच अंतिम तांत्रिक प्रक्रिया सुरू असून काम पूर्ण होताच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महापालिकेने रस्ते विकास कामांमध्ये गुणवत्ता आणि टिकाऊपणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य असून अंतिम प्रक्रिया पूर्ण होताच हा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे आयुक्त खत्री यांनी सांगितले.
