नाशिक : जवळपास तीन आठवडय़ांपासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाचे बुधवारी शहर परिसरात दमदार आगमन झाले. विजांच्या कडकडाटासह काही भागांत अकस्मात कोसळलेल्या पावसाने नागरिकांसह लहान-मोठय़ा विक्रेत्यांची तारांबळ उडवली. पहिल्याच पावसात सराफ बाजार, दहीपूल फूल बाजार जलमय व चिखलमय झाल्यामुळे वाहने व दुकानांचे नुकसान झाले. या भागात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत केलेल्या कामामुळे पाणी साचणार नसल्याचा दावा केला जात होता. तो फोल ठरला. गोदा काठावरील आठवडे बाजाराला पावसाची झळ बसली. तुडुंब भरलेल्या गटारीतून पाणी पात्राकडे वाहू लागल्याने विक्रेत्यांचे साहित्य वाहून गेले. अनेकांना ते वाचविण्यासाठी शर्थीने प्रयत्न करावे लागले. विजेचा लपंडाव सुरू झाला. पावसाने वातावरणात गारवा पसरला आहे.

जिल्ह्यात चार ते पाच तालुके वगळता इतरत्र पावसाचे आगमन झाले नव्हते. ज्या भागात त्याने हजेरी लावली, तेथूनही तो गायब झाला होता. जलसाठा खालावत असल्याने टंचाईचे संकट गडद होत आहे. पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडण्याची धास्ती व्यक्त केली जात असताना जूनच्या उत्तरार्धात शहरासह अनेक भागांत त्याने हजेरी लावली. तीन-चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. सकाळी वेगळी स्थिती नव्हती. वातावरण ढगाळ होते. पुन्हा तो हुलकावणी देईल, असे वाटत असताना दुपारी अडीचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दोन ते तीन तास संततधार सुरू होती. हंगामात प्रथमच रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. सखल भागात पाणी साचले. सामान्यांसह विक्रेत्यांची तारांबळ उडाली. सराफ बाजार, दहीपूल, फुल बाजार, शुक्ल गल्ली परिसर जलमय झाला. पाण्यासोबत चिखलही वाहून आल्याने परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले. ३० ते ४० दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाल्याचे सराफ असोसिएशनचे  गिरीश नवासे व चेतन राजापूरकर यांनी सांगितले. वाहनतळावरील वाहने पाण्यात बुडाली. हुंडीवाला लेनमधून काही वाहने पाण्यासोबत वाहून आली.

पावसाचा फटका बुधवारच्या बाजारातील विक्रेत्यांना बसला. ग्रामीण भागातून शेकडो विक्रेते गोदा काठावर दुकाने थाटतात. पावसाने आसपासच्या गटारी तुडुंब होऊन ओसंडून वाहू लागल्या. ते पाणी गोदा पात्राकडे आल्याने दहीपुलाखालील विक्रेत्यांचा भाजीपाला आणि तत्सम साहित्य भिजले. पाण्यात काही वाहून गेले. साहित्य वाचविण्यासाठी विक्रेत्यांची धांदल उडाली. गटारीचे पाणी गोदापात्रात मिसळत असल्याने परिसरात दरुगधी पसरली. काही ठिकाणी झाडांनी मान टाकली. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे वेगवेगळय़ा तक्रारी येत होत्या.

यापूर्वी मृग नक्षत्राच्या प्रारंभी म्हणजे ८ जूनला काही तालुक्यांत वादळी वाऱ्यासह तडाखेबंद पावसाने झोडपून काढले होते. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर मात्र त्याने वक्रदृष्टी केली. परिणामी खरिपांच्या पेरण्या खोळंबून शेतकऱ्यांची चिंता वाढली. आद्र्रा नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने आशा पल्लवीत झाली आहे.

समाधानकारक पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नये, असे कृषी विभागाने आधीच म्हटलेले आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नाशिक शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. या स्थितीत सर्व घटक चातकाप्रमाणे ज्याची प्रतीक्षा करीत होते, त्या पावसाची प्रतीक्षा संपुष्टात आल्याची भावना उमटत आहे. पावसाने वातावरणात बदल झाले.

व्यावसायिकांचा मनपावर रोष

पावसाळय़ात सराफ बाजार, दहीपूल परिसरात दरवर्षी पाणी शिरते. त्यावर तोडगा म्हणून स्मार्ट सिटीअंतर्गत पावसाचे पाणी पात्रात वाहून जाण्यासाठी विशेष योजना राबविली गेली. परंतु, तिचा कुठलाही उपयोग झाला नाही. गटारी व नाल्यांची साफसफाई न झाल्याची परिणती पहिल्याच पावसात परिसर जलमय होण्यात झाल्याचा आरोप सराफ असोसिएशनचे गिरीश नवासे यांच्यासह अन्य व्यावसायिकांनी केला. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. चिखलमय परिसराची व्यावसायिकानी स्वच्छता केली. चिखलात अनेक वाहनांचे नुकसान झाले. पाऊस थांबल्यानंतर मनपाचे वाहन या भागात आल्यावर संतप्त व्यावसायिकांनी ते रोखून धरले. महापालिकेने कुठलीही पूर्वतयारी केली नसल्याने ही स्थिती ओढावल्याचा आरोप झाली नसल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली. पहिल्याच पावसाने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.

गतवर्षीसारखा प्रवास

यंदा जिल्ह्यात पावसाचा प्रवास गेल्या वर्षीप्रमाणे राहिल्याचे लक्षात येते. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत ७६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा हे प्रमाण त्यापेक्षा कमी म्हणजे ५९.६ मिलिमीटर आहे. मागील २४ तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हंगामात पेठ, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, चांदवड अशा काही मोजक्याच तालुक्यात हजेरी लावणारा पाऊस आद्र्रा नक्षत्रात संपूर्ण जिल्हा व्यापेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.