लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : मनमाड येथील मुलांच्या निरीक्षण गृहातून पळालेल्या पाच विधीसंघर्षित बालकांना शोधण्यात निरीक्षणगृहाचे कर्मचारी तसेच मनमाड पोलिसांना यश आले आहे. त्यांना निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असून बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

मनमाड येथील मुलांच्या निरीक्षण गृहातील काही विधीसंघर्षित बालके तेथील वातावरणास कंटाळल्यामुळे त्यांनी बाहेर पडण्याची योजना आखली. रविवारी रात्री उशीरा निरीक्षणगृहातील कर्मचारी अक्षय डिंबर यांच्याकडे त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. त्यांनी बादलीतून पाणी आणत जारमध्ये घ्या, असे मुलांना सांगितले. त्यानंतर विधीसंघर्षित बालकांनी चहाची मागणी करत डिंबर यांच्याशी वाद घातला. त्यांना मारहाण केली. त्यांच्या हाताचा चावा घेत पाच जण पळून गेले.

आणखी वाचा-शेतात १० वर्षांपूर्वी हरवलेली सोन्याची अंगठी मजुरांना सापडली

दरम्यान, या प्रकाराची माहिती निरीक्षणगृहाच्या वतीने मनमाड पोलिसांना देण्यात आली. गस्तीवरील पोलीस आणि निरीक्षणगृहाचे कर्मचारीही बालकांचा शोध घेऊ लागले. बालके मनमाडच्या नवीन बस स्थानक परिसराकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि निरीक्षणगृहाचे अधिकारी त्या ठिकाणी गेले असता बालके तिथे आढळली. परंतु, अंधाराचा फायदा घेत तीन जण फरार झाली. दोन बालकांना ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी फरार बालकांचा पुन्हा शोध घेण्यात आला. शहराजवळील नदी परिसरातील झाडाझुडपांमध्ये अन्य तीन बालके पोलिसांना सापडली. पोलिसांनी तीनही बालकांना निरीक्षणगृहाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. पाचही बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.

Story img Loader