धुळे: भरधाव खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक झाली.या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले.जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या दसवेल फाट्याजवळ आज सकाळी हा अपघात झाला.मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. मृत आणि जखमी शिंदखेडा तालुक्यातील रहिवाशी असल्याचे म्हटले जात असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

जखमींना तातडीने धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.वारूळ (ता. शिंदखेडा) गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत असतांना हा अपघात झाला.खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचे म्हटले जात आहे.या अपघातात त्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे.