अमृतधाम चौफुली अजून किती बळी घेणार?

पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल यादरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावर महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उड्डाणपूल उभारणीसाठी भूमिपूजनाचा डामडौल करण्यात आला, परंतु भूमिपूजनानंतर दीड वर्षे होऊनही उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात झालेली नाही. दरम्यान, महामार्गावरील अमृतधाम चौफुलीने सोमवारी पुन्हा एकाचा बळी घेतला.  या बळीनंतर तरी उड्डाणपुलाचे काम सुरू होईल काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

महामार्गावर वाघ महाविद्यालयापासून अमृतधाम, रासबिहारी आणि जत्रा हॉटेल या तीन ठिकाणी धोकादायक चौफुली आहे. या तीनही ठिकाणी आजपर्यंत अनेक अपघात झाले असून कित्येकांचे बळी गेले, तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असताना राहिलेल्या त्रुटींचा फटका परिसरातील रहिवाशांना बसत आहे. अमृतधाम चौफुलीवर सोमवारी झालेला अपघात हा त्यापैकीच एक होता. या अपघातात हनुमाननगर परिसरात राहणारे अविनाश पाटील हे मृत्युमुखी पडले आहेत. ते एका शाळेत कारकून म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील कर्ती व्यक्ती तिचा कोणताही दोष नसताना अपघातात बळी गेल्याने कुटुंबातील सर्व सदस्य अजूनही भांबावलेल्या अवस्थेत आहेत. दोनही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आता कशी पेलायची, असा प्रश्न कुटुंबासमोर आहे. अपघातानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित राहात असले तरी या घटनेमागे अपघातास कारणीभूत ट्रकचालकाची चूक हे एक मुख्य कारण मानले जात आहे. काही जणांच्या मते त्याने मद्यपान केलेले होते. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणारे अनेक जण आहेत. खासगी प्रवासी वाहनांवरील अनेक चालक तशा अवस्थेत दिसतील. वाहतूक पोलिसांनी चालकाकडील कागदपत्रांची तपासणी करतानाच चालक नशेत तर नाही ना, याचीही तपासणी करण्याची गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे. कोणत्याही टोल नाक्यावर प्रत्येकाला वाहन थांबवावे लागत असल्याने अशा ठिकाणी चालकाची अशा प्रकारची तपासणी सहजशक्य आहे. अपघातात अविनाश पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे परिसरातील रहिवाशांचा रोष उफाळून आला आहे. पुन्हा एकदा चौफुलीवर आतापर्यंत किती अपघात झाले, त्याची उजळणी होऊ लागली आहे, परंतु उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन दीड वर्षांचा कालावधी होऊनही काम का सुरू होत नाही, हा प्रश्न श्रेयासाठी पुढे येणाऱ्या लोकप्रतिनिधींना विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.

विचित्र अपघातात अविनाश पाटील यांचा मृत्यू

हनुमाननगरमध्ये राहणारे निवृत्त कर्मचारी श्रावण पाटील यांचा अविनाश (४६) हा मुलगा. अविनाश पाटील यांना महाविद्यालयात जाणारा मुलगा, तर नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेली एक मुलगी आहे. मुलीच्या अकरावी प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी ते सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास दुचाकीने के. के. वाघ महाविद्यालयाजवळील दुकानात गेले होते. झेरॉक्स करून ते सव्‍‌र्हिस रोडने परतत असताना अमृतधाम चौफुलीवर थांबले. त्याच वेळी ओझरकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने चौफुलीवरील गतिरोधकामुळे वेग कमी केलेल्या कारला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे कारची पुढे असलेल्या दुचाकीला धडक बसून त्यावरील दाम्पत्य जखमी झाले. केवळ कारला धडक देऊन ट्रक थांबला नाही. मुख्य रस्ता आणि सव्‍‌र्हिस रोड यांच्यामध्ये असलेले लोखंडी दुभाजक तोडत तिने चौफुलीवर थांबलेल्या अविनाश पाटील यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात दूर फेकले जाऊन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.