शहरी भागात स्वच्छता मोहीम थंडावली असली तरी बुधवारी नांदगाव येथे प्रशासनातर्फे ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’अंतर्गत राबविलेल्या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या मोहिमेत ‘स्वच्छ नांदगाव, सुंदर नांदगाव’ची शपथ घेत परिसराची स्वच्छता करण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसीलदार अनिल गवांदे, नगराध्यक्षा शैला गायकवाड, मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी मोहिमेत सहभाग घेतला. नगरपालिकेच्या प्रांगणात मोहिमेला सुरुवात झाली. नागरिक तसेच दुकानमालकांना आपला परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन करण्यात आले. मोहिमेंतर्गत मुख्य बाजारपेठ, पॉवर हाऊस, कोर्टगल्ली, अहिल्यादेवी चौक, शनिमंदिर पुलाचा भाग, बौद्धनगर, दत्तनगर, पोलीस स्टेशन, बालाजी चौक, म. फुलेचौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आदी भागांत लोक सहभागातून मोहीम राबविण्यात आली. शहरातून जाणाऱ्या शाकंबरी नदीपात्राची स्वच्छता जेसीबीने करण्यात आली. रस्त्यालगच्या टपऱ्या आणि दुकानांना स्वयंसेवी संस्थांनी कचराकुंडीचे वाटप केले. मोहिमेत नगरसेवक, सेवाभावी संस्था, बचत गट, विद्यार्थी, एनएसएस, एनसीसीचे पथक, माजी सैनिक आदींनी सहभाग घेतला. सर्वानी घरूनच स्वच्छतेसाठी साहित्य आणले होते. प्रशासनातर्फेदेखील साहित्याची व्यवस्था करण्यात आली होती. कचरा उचलण्यासाठी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. या मोहिमेत सातत्य ठेवत नांदगाव शहर स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून शासनाने सुरू केलेल्या अभियानात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, वर्षभरापूर्वी पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान जाहीर केल्यानंतर शहरी भागात असे कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात आले होते. तथापि, वर्षभरानंतर सर्वाना त्याचा विसर पडला होता.