जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या भवितव्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी केवळ संघटनात्मक स्तरावर मर्यादित न राहता, जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम करणारी ठरण्याची चिन्हे आहेत. निष्ठावानांसह पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांमधील अस्वस्थता त्यामुळे वाढली आहे.

जळगाव जिल्हा हा गेल्या काही वर्षांत राजकीयदृष्ट्या खूपच अस्थिर राहिला आहे. सततचे पक्षांतर, राजकीय आघाड्या आणि नव्या नेतृत्वाच्या शोधामुळे येथील राजकारण कायमच चर्चेत राहिले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी अनेक दिग्गजांनी घेतला होता. मात्र, अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संबंधित सर्व नवप्रवेशित नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची अस्वस्थता आता वाढली आहे. पक्षाचा प्रमुख चेहरा काळाच्या पदड्याआड गेल्यानंतर पुढील राजकीय दिशा काय असावी, याबाबत संबंधितांमध्ये आता संभ्रमाचे वातावरण आहे. अजित पवार हे केवळ ताकदवान नेतेच नव्हते, तर संघटन मजबूत करणारे आणि स्थानिक नेत्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या प्रभावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावसारख्या जिल्ह्यात नव संजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

अजितदादांचे जळगावकडे विशेष लक्ष…

जळगाव जिल्ह्यातील मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने केवळ अमळनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. आणि ती जागा जिंकण्यात पक्षाला यश आले होते. मात्र, संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता अजित पवार गटाचा प्रभाव अपेक्षेइतका दिसून आला नाही. मर्यादित यशामुळे जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज अधिक तीव्र झाली होती. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. जळगावमधील अनुभवी आणि प्रभावी नेत्यांना पक्षात घेऊन संघटन मजबूत करण्याच्या दिशेने त्यांनी पाऊल टाकले होते. माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे तसेच कैलास पाटील यांचा पक्षप्रवेश ही त्याच रणनीतीचा भाग मानली जात होती.

दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले तरी…

दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी मिळेल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष अधिक प्रभावी ठरेल, अशी आशा अजित पवार यांना होती. विविध तालुक्यांमध्ये प्रभाव असलेल्या नेत्यांना एकत्र आणून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा पवार यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. प्रत्यक्षात, ज्यांच्याकडे पाहुन शरद पवारांची साथ सोडली तेच अजित पवार आज हे जग सोडून गेल्याने नव्याने प्रवेश घेणारे नेते आणि पदाधिकारी आता सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. काही नेते राजकीय पर्यायांची चाचपणी करत असल्याची चर्चा देखील आहे. यामुळे जळगावातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाले तरी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांकडे गेलेल्यांना एकसंध पक्षात पुन्हा सन्मानाची वागणूक मिळते की नाही, त्याबद्दलही साशंकता आहे.