scorecardresearch

जळगाव: सायाळची शिकार करणारे चौघे वनविभागाच्या जाळ्यात

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द शिवारातील शेतातील शेडमध्ये धुलिवंदनच्या दिवशी वन्यप्राणी सायळची (साळिंदर) शिकार करीत त्याच्या मटणावर ताव मारण्यापूर्वीच वनविभागाच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले.

Forest department arrests four who hunted syal Jalgaon
सायाळची शिकार करणारे चौघे वनविभागाच्या जाळ्यात

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा खुर्द शिवारातील शेतातील शेडमध्ये धुलिवंदनच्या दिवशी वन्यप्राणी सायळची (साळिंदर) शिकार करीत त्याच्या मटणावर ताव मारण्यापूर्वीच वनविभागाच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>Video: दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया; पोलीस तपासावरच सवाल उपस्थित

मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे चिंचखेडा खुर्द येथील शेतकरी सुपडा मेनकर यांच्या गट क्रमांक ३८ मधील शेतात वन्यप्राणी सायाळची शिकार करून काही जण त्यास कापत असल्याची माहिती जळगावचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार, मानद वन्यजीवरक्षक विवेक देसाई, मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांना मिळाली. वढोदा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांनी वनपाल बी. आर. मराठे, वनरक्षक ज्ञानोबा धुडगंडे, राम आसुरे, बी. बी. थोरात, गोकुळ गोसावी, वनमजूर अशोक तायडे, अशोक पाटील यांचे पथक नियुक्त केले. पथकाने चिंचखेडा खुर्द शिवारात वन्यप्राणी सायळचे मांस चुलीवर शिजत असताना त्यावर संशयितांकडून ताव मारण्यापूर्वीच छापा टाकला. याप्रकरणी निवृत्ती ऊर्फ बाबूराव मेनकार, ऋषिकेश अहिरकर, सुपडा मेनकार (सर्व रा. चिंचखेडा खुर्द, ता. मुक्ताईनगर), शंकर सपकाळ (रा. बुलडाणा) यांना अटक करण्यात आली. पथकाने घटनास्थळावरून रक्ताने माखलेली काठी, सायाळचे चार पंजे आणि अर्धवट जळालेले सायाळचे काटे जप्त केले. वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे तपास करीत आहेत. सुपडा मेनकर यांना ताब्यात घेत विचारपूस व चौकशी केली. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 21:10 IST
ताज्या बातम्या