शिंगवे बहुल्यात बिबटय़ासह दोन बछडे जेरबंद

सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी पर्यायी जागा शोधत आहेत.

देवळाली कॅम्प लगतच्या धोंडी रोड परिसरात दोन बछडय़ांसह जेरबंद झालेला बिबटय़ा

काही महिन्यांपासून शिंगवे बहुला परिसरात स्थानिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या बिबटय़ासह दोन बछडय़ांना मंगळवारी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. शहर व सभोवतालच्या परिसरात बिबटय़ाचा संचार हा तसा काही नवीन नाही. सध्या सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी पर्यायी जागा शोधत आहेत. देवळाली कॅम्पलगतच्या फायरिंग रेंज परिसरात पाणीटंचाई भेडसावत असल्याने बिबटय़ांचा आसपासच्या परिसरात मुक्त संचार असल्याची स्थानिकांची भावना आहे. तथापि, ही बाब वनविभागाला मान्य नाही. तोफखान्याच्या सरावावेळी तोफगोळ्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे भयभीत झालेले वन्य प्राणी रेंजच्या परिसरातून बाहेर पडण्यासाठी धडपड करतात. त्याची परिणती, अशा घटनांमध्ये होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागात बिबटय़ाचा धुमाकूळ, हल्ले, मुक्त संचार असे अगणित प्रकार गेल्या काही वर्षांत घडले आहेत. वाढत्या घटनांमुळे बिबटय़ांना जेरबंद करणे हे वनविभागासमोर जणू नित्याचे काम ठरले. नाशिक शहरालगतच्या देवळाली कॅम्प येथे तोफखाना दलाचे हजारो एकरचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. तोफखान्याचा सराव या फायरिंग रेंजमध्ये केला जातो. हा परिसर मानवी वस्तीरहित असल्याने बिबटय़ांना त्या माध्यमातून आश्रयस्थान उपलब्ध झाले. या रेंजमधून आसपासच्या भागात अनेकदा बिबटय़ांचा वेगवेगळ्या कारणांनी संचार झाल्याची उदाहरणे आहेत. त्याची पुनरावृत्ती शिंगवे बहुला परिसरात झाली. सहा महिन्यांपासून परिसरात बिबटय़ाचे अस्तित्व जाणवत होते. महिनाभरापूर्वी धोंडीरोड भागातील अनिल निसळ यांच्या बंगल्यात बिबटय़ाने कुत्र्यावर हल्ला चढविला होता. त्यानंतर देवळाली हायस्कूल परिसरात त्याचे दर्शन घडले. या संदर्भात स्थानिकांनी वनविभागाला माहिती देऊन बिबटय़ाला जेरबंद करण्याची मागणी केली होती. वनअधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करत सरैया सॅनेटेरियमच्या मागील नाल्यालगत िपजरा लावला होता. मंगळवारी पहाटे त्यात बिबटय़ा दोन बछडय़ांसह जेरबंद झाला. याच भागात वास्तव्यास असणारे फक्रुद्दीन साया सकाळी फिरत असताना त्यांना डरकाळी ऐकू आली, तेव्हा बिबटय़ा जेरबंद झाल्याची बाब समोर आली.
जेरबंद झालेला बिबटय़ा (मादी) सुमारे तीन वर्षांची असून दोन्ही बछडे सहा महिन्याचे असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी सांगितले. बिबटय़ा जेरबंद झाल्यामुळे स्थानिक नागरिक आणि देवळाली हायस्कूलसह सेंट पॅट्रिक्स विद्यालयाने सुटकेचा नि:श्वास टाकला. बिबटय़ा जेरबंद झाल्याची माहिती समजल्यानंतर पोलीस व वनअधिकाऱ्यांनी धाव घेतली. बिबटे व बछडय़ांना पांडवलेणीस्थित उद्यानात हलविण्यात आले. फायरिंग रेंजच्या क्षेत्रात पाणीटंचाई असल्याने बिबटे बान्झ स्कूलच्या नाल्यातून धोंडी रोडकडे येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परंतु ही बाब वनविभागाला मान्य नाही. तोफखान्याचा सराव सुरू झाल्यावर प्रचंड आवाज होतो. त्यामुळे वन्यप्राणी भयभीत होऊन सैरभैर धावू लागतात आणि लष्करी क्षेत्राबाहेर येत असल्याचा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Forest department success to caught leopard

ताज्या बातम्या