नाशिक परिसरातील गोदावरी चेंबर इमारतीच्या तळघरातील अग्रवाल असोसिएशन येथे बनावट रेशनकार्ड, जातप्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विविध शाळांचे दाखले, अधिकाऱ्यांचे शिक्के तयार करणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे. तहसीलदार गणेश राठोड यांनी सोमवारी (दि. १०) गोदावरी चेंबर या इमारतीत टाकलेल्या छाप्यात सर्व पुरावे ताब्यात घेतले असून याप्रकरणी प्रमोद नार्वेकर आणि हरीश्चंद्र अग्रवाल या दोन संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अग्रवाल यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा संशयित मात्र पसार झालेला आहे.
मुंबई आग्रा महामार्गालगत पंचवटी महाविद्यालयासमोरील या इमारतीच्या तळघरात गाळा क्रमांक ९ मध्ये बनावट रेशनकार्ड बनवण्यात येत असल्याची माहिती प्रभारी धान्य वितरण अधिकारी तहसीलदार गणेश राठोड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे राठोड यांनी सोमवारी दुपारदरम्यान पुरवठा निरीक्षक देबे आणि नायब तहसीलदार शेवाळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. या छाप्यात अधिकाऱ्यांना याठिकाणी बनावट रेशनकार्ड, कोरे, स्वाक्षरी केलेले पिवळे आणि केशरी रेशनकार्ड, बनावट शिक्के, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, सध्याच्या आणि बदली झालेल्या जुन्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे जातीचे दाखले, महानगरपालिकेचे जन्म व मृत्यूचे कोरे प्रमाणपत्र, शाळांचे दाखले याठिकाणी आढळून आले.
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर तहसीलदारानी पंचवटी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. याप्रकरणी सर्व पुरावे ताब्यात घेण्यात येऊन रात्री उशिरापर्यंत पंचवटी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याप्रकरणी हरीश्चंद्र रामचंद्र अग्रवाल (वय ५२, रा. हिरावाडी, पंचवटी) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा दुसरा संशयित साथीदार प्रमोद नार्वेकर (वय ६५) हा फरार आहे. यापूर्वीही त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, तो एजंटचे काम करत असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
पोलिसांनी याठिकाणी टाकलेल्या छाप्यात शहरातील कन्या कोठारी, रुंग्ठा शाळा, गांधीनगर येथील जनता विद्यालय तसेच परतूर आणि चाळीसगाव येथील काही शाळांचे दाखले, मुख्याध्यापकांचे शिक्केही आढळले. या दाखल्यांसह कोरे सात बारा उतारे सापडले. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीलकुमार पुजारी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरु आहे.