महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अजब खोदकामामुळे काही महिन्यांपासून अपघात, दुर्गंधीयुक्त, गढूळ पाणी पुरवठा या समस्यांना तोंड देणाऱ्या राका कॉलनी आणि टिळकवाडी परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी मंगळवारी थेट खड्ड्यांमध्ये उतरून आंदोलन केले. परिसरातील खड्डे तातडीने बुजवून या भागातील नळ जोडण्याही नव्या वाहिनीला जोडण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा >>> जळगाव महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचा निकाल
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या खोदकामाने अवघे शहरवासीय अनेकदा वेठीस धरले गेले आहेत. टिळकवाडी आणि राका कॉलनी परिसरातील मनपा व स्मार्ट सिटीने वेगवेगळ्या कामांसाठी स्वतंत्रपणे खोदकाम करीत समस्यांमध्ये भर घातली. प्रभाग क्रमांक १२ मधील हा परिसर आहे. नगरसेवक निधीतून परिसरातील पाणी पुरवठा, भुयारी गटारीची कामे करण्यात आली. त्यानंतर कॉलनी रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. रस्त्यालगतच्या पट्टीत पेव्हर ब्लॉक टाकले गेले. ही कामे झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसात स्मार्ट सिटी कंपनीने रस्ते मधोमध खोदत वीज, दूरसंचारसह जल वाहिन्यांचे नुकसान केले. त्यामुळे गटार व जल वाहिन्या फुटून नागरिकांना गेल्या दोन महिन्यापासून दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. फोडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याची तक्रार डॉ. पाटील यांनी केली. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने त्यांनी टिळकवाडीतील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे उपोषणाचा निर्णय घेतला. खोदलेल्या खड्ड्यांमध्ये उतरून आंदोलन केले.
हेही वाचा >>> परिवर्तन संस्थेच्या नाटकाची काला घोडा महोत्सवासाठी निवड
आंदोलनाची माहिती मिळाल्यावर मनपा व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. गटार व जल वाहिनीचे पाणी कुठे मिसळते याचे ठिकाण शोधण्यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम केले गेले. बरीच शोधाशोध करूनही ती जागा सापडली नाही. अखेर जल वाहिनी बदलली गेली. जुन्या जल वाहिनीवरील जोडण्या नव्या वाहिनीवर स्थलांतरीत करणे गरजेचे होते. परंतु, त्याकडे डोळेझाक केली गेली. त्यामुळे स्थानिकांना गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीने शहरात रात्रंदिवस पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकल्या जात असल्याचे म्हटले आहे. टिळकवाडी परिसर व पोलीस वसाहतीत २४ बाय सात पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने वाहिन्या टाकल्या जात आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे कंपनीकडून लेखी स्वरुपात सांगण्यात आले. ठिकठिकाणी खोदलेले खड्डे त्वरित बुजविण्याचे मान्य करण्यात आले. जुन्या वाहिनीवरील नळ जोडण्या नव्या वाहिनीवर जोडल्या जाणार आहे.