लोकसत्ता वार्ताहर

मनमाड : नगरपालिकेच्या माजी नगरसेविकेच्या मुलाची पूर्ववैमनस्यातून चार जणांनी हत्या केली. हल्लेखोरांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी संतप्त जमावाने मनमाड शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला.

शुभम पगारे (२७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. हत्येनंतर संतप्त जमावाने मृतदेहासह पोलीस ठाण्यासमोर दोन ते तीन तास ठिय्या दिला. मारेकऱ्यांना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मालेगाव विभागाचे अप्पर अधीक्षक अनिकेत भारती हे मनमाड पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.

आणखी वाचा- नाशिक: रामकुंडात पाय घसरुन अभियंता पुरात बेपत्ता, सुरगाण्यात पुरात महिलेचा मृत्यू; काकुस्ते गावात घरांमध्ये पाणी

शेखर पगारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनमाड शहर पोलीस ठाण्यात रुशांत रूडके, कृष्णा थोरात, मोहित उर्फ ओम पगारे आणि एक अनोळखी अशा चौघांविरुद्ध विविध कलमांन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुभम हा माजी नगरसेविका नूतन पगारे यांचा मुलगा आहे. सामाजिक कार्यकर्ते विलास उर्फ पिंटू कटारे यांचा तो भाचा आहे. पांडुरंग नगर भागात दोन युवकांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद होता. शुभम शनिवारी मध्यरात्री घरी जात असताना स्टेडियम रोड परिसरात चौघांनी धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर हल्ला करणारा संशयितही जखमी झाला.

गंभीर जखमी झालेल्या शुभमला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. तर दादू सुदगे हा संशयित जखमी असून त्याला मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून दोघेही राहत असलेल्या भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.