भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकऱ्यांमध्ये असंतोष

नाशिक : इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पीक विम्यानुसार नुकसान भरपाई मिळावी, यासाठी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.  करोना महामारीने त्रस्त आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सबंधित अधिकारी स्तरावर पीकविमा कंपनीकडून त्वरीत भरपाई मिळावी, यासाठी माजी आमदार मेंगाळ हे  उच्च न्यायालयात जाणार  आहेत.

इगतपुरी तालुक्याचे मुख्य पीक असलेल्या भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित अधिकारी आणि तलाठी यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामे के ले गेले. परंतु, पीक विमा कंपनीने बहुतांशी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही त्यांना पीक विमा कंपनीकडून भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत सतत अस्मानी संकटाने शेतकरी बेजार झाले असून पीक विमे भरले असताना देखील त्यांना भरपाई मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

विशेष म्हणजे बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आलेला पीक विम्याचा पावती कोडही चुकीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किती पीक विमा भरला ते लक्षात येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्या असतील त्या पावत्या घोटी येथे जमा कराव्यात, असे आवाहन मेंगाळ यांनी केले आहे.