जळगाव : छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेतून उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या नावाने कोट्यवधींचे कर्ज काही वर्षांपूर्वी घेण्यात आले होते. मुदतीत परतफेड न झाल्याने कंपनीशी संबंधित शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांची मालमत्ता नुकतीच जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बँक प्रशासनाने जप्त मालमत्तेसंदर्भात आणखी एक जाहीर नोटीस आता प्रसिद्ध केली आहे.
उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या नावाने घेण्यात आलेले औद्योगिक कर्ज ठरलेल्या मुदतीत परतफेड न झाल्याने संबंधित खाते कालांतराने एनपीए म्हणून घोषित करण्यात आले. बँकेने कंपनीला परतफेडीसाठी अतिरिक्त मुदत दिली; परंतु, कर्जाची रक्कम वेळेवर भरली न गेल्याने बँकेने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.
या दरम्यान, कंपनीचे संचालक माजी खासदार उन्मेश पाटील तसेच संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांनी बँकेकडे गहाण ठेवलेली यंत्र सामग्री संगनमताने विकल्याचे उघड झाले. या व्यवहारामुळे देवगिरी बँकेला कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानुसार माजी खासदार पाटील यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि इतर कलमान्वये नोव्हेंबर २०२५ मध्ये गुन्हा नोंदवला.
जानेवारीतच मालमत्ता ताब्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खासदार पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी पाटील यांना अटकपूर्व जामीन देखील मंजूर झाला. त्याप्रसंगी आपला आवाज बंद करण्यासाठीच भाजपने या प्रकरणात गोवल्याचा आरोप माजी खासदार पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला. तसेच या प्रकरणात आपण कर्जदार नाही तर फक्त जामीनदार आहोत. त्यानंतरही मला क्रमांक एकचा आरोपी करण्यात आल्याची टीका पाटील यांनी केली होती. तरीही, १५ जुलै २०२५ रोजी बजावलेल्या नोटीसीनुसार देवगिरी सहकारी बँकेने माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नावावरील चाळीसगाव येथील ७११.६० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही पूर्ण केली. जप्त केलेली मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या अधिनियमानुसार एक जानेवारी २०२६ रोजी ताब्यात सुद्धा घेतली.
जाहीर नोटीसीत नवीन काय?
देवगिरी बँकेने त्यानंतर आता कर्जदारांसह नागरिकांना चाळीसगावमधून ताब्यात घेण्यात आलेल्या माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या मालकीच्या नगर भूमापन क्रमांक २७६ या मालमत्तेशी संबंधित कोणताही व्यवहार न करण्याचे आवाहन जाहीर नोटिसीद्वारे केले आहे. व्यवहार केल्यास देवगिरी सहकारी बँकेच्या बोजाची रक्कम सुमारे सहा कोटी ६४ लाख ४५ हजार ७०० रुपये अधिक मुद्दल रक्कम सहा कोटी १६ लाख ५४ हजार ८३५ रुपये आणि त्यावरील एक ऑक्टोबर २०२३ पासूनचे व्याज या रकमेला अधीन राहावे लागेल, असे देवगिरी बँकेने जाहीर नोटीसीत म्हटले आहे.
देवगिरी सहकारी बँकेने वृत्तपत्रातून बजावलेली जाहीर नोटीस अजून पाहण्यात आलेली नाही. त्याविषयी अधिक माहिती घेतल्यानंतरच बोलता येईल.-उन्मेश पाटील (माजी खासदार, जळगाव)

