जळगाव : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. या वेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार होतील,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, सध्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे आहेत.

मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्ष प्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी खासदार असताना केलेल्या कार्याचा गौरव केला. “उन्मेश पाटील हे जळगावमधील लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी खासदार म्हणून काम करताना अनेक चांगली विकासकामे केली. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे गडबड झाल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र त्यांचे राजकीय भविष्य मोठे आहे. आगामी काळात त्यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी,” असे शिंदे म्हणाले. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे महायुतीला मोठे जनसमर्थन मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

“लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यातील महिलांमध्ये महायुतीबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार निवडून आले,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी वातावरण हलके फुलके करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “आपला खान्देश, आपला उन्मेश” असा नारा दिला. “फक्त मंत्री गुलाबराव पाटील हेच डायलॉग मारतात असे नाही, मीही मारतो” या त्यांच्या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे बोलत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांचे लक्ष दुसरीकडे असल्याचे दिसून आले. तेव्हा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारत “काय गुलाबराव?” असे म्हणत त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर मंत्री पाटील यांनीही “आपला खान्देश, आपला उन्मेश” असे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. या प्रसंगामुळे कार्यक्रमात काही काळ हास्याचे वातावरण निर्माण झाले.

पाटील यांना कोणत्या मतदारसंघात संधी?

या प्रवेश सोहळ्यास पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, शिवसेना शिंदे गटाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उन्मेश पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्मेश पाटील यांनी यापूर्वी जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदारसंघात बऱ्यापैकी प्रभाव आहे. ठाकरे गट सोडून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे सध्या जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये जागावाटप कसे होणार, तसेच उन्मेश पाटील यांना कोणत्या मतदारसंघातून संधी मिळणार, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, उन्मेश पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाला जिल्ह्यात काही प्रमाणात धक्का बसल्याचे मानले जात आहे.